टेंभूचे पाणी आल्याने आबांचे स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:52+5:302021-06-16T04:36:52+5:30
फोटो ओळी - आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, अनिता सगरे, ...
फोटो ओळी - आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, अनिता सगरे, टी. व्ही. पाटील, दत्ताजीराव पाटील, संजय हजारे आदी उपस्थित होते.
ढालगाव/शिरढोण : संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातील शेती ओलिताखाली यावी आणि येथील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन व्हावे हे आर. आर. पाटील यांचे स्वप्न होते. ढालगाव विभागात टेंभूचे पाणी येत आहे. त्यामुळे आबांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार सुमनताई पाटील यांनी केले.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे टेंभू योजनेच्या बानूरगड बोगद्यातून कवठेमहांकाळ तालुक्याकडे येणाऱ्या टेंभूच्या पाण्याची चाचणी सोमवारी घेण्यात आली. याचा प्रारंभ आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
सुमनताई पाटील म्हणाल्या की कवठेमहांकाळच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजनेला आर. आर. पाटील यांनी चालना देऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी देण्याचे कार्य केले. त्यामुळे आज तासगवचा पूर्व भाग असो अन्यथा कवठेमहांकाळचा पश्चिम भागात शेतकरी कष्ट करून सोने पिकवित आहेत. शेतकरी सुखी झाला आहे. आज टेंभूचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने व जयंत पाटील हे जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सिंचन योजना पूर्ण होतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी अनिताताई सगरे, टी. व्ही. पाटील, संजय हजारे, दत्ताजीराव पाटील, जगनाथ कोळेकर, एम. के. पाटील, अय्याज मुल्ला, चंद्रशेखर सगरे, दादासाहेब ढेरे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
३६ किमी प्रवास
टेंभू योजनेच्या बानूरगड बोगद्यातून कवठेमहांकाळ मुख्य कालव्यात हे पाणी येणार असून येथून सुमारे ३६ किमी हे पाणी करलहट्टी या शेवटच्या गावापर्यंत जाणार आहे.