चांदोली धरणातील पाणी मेपर्यंत संपण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 03:27 PM2019-04-12T15:27:36+5:302019-04-12T15:28:34+5:30
पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.
- गंगाराम पाटील
वारणावती : पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. वारणेच्या कालव्यामार्फत शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी कालव्यांच्या दुरवस्थेमुळे वाया जात आहे. अशातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला धरणात ६.७४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
सध्या धरणातून नदीमार्फत १ हजार ४१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दि. ११ एप्रिलअखेर हाच पाणीसाठा ९.३० टीएमसी आहे.
ही आकडेवारी पाहता, आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी होत आहे. थोडक्यात, ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास मेअखेर धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल. साधारण १५ जूनपासून पावसाला सुरुवात होते, असा अंदाज बांधला, तर उर्वरित पंधरा दिवस वारणा पट्ट्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. या ना त्या कारणाने पाण्याची मागणी वाढल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे. हा विसर्ग वाढवला तर, मे महिन्याआधी ऐन उन्हाळ्यातच धरण कोरडे पडणार आहे.
चांदोली परिसरात गतवर्षी २ हजार ९६५ मिलिमीटर पाऊस पडला होता. धरणही शंभर टक्के भरले होते. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा इतिहास पाहता, तीस जूनपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात असायचा. यंदा मात्र नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ होणे स्वाभाविक आहे.
मात्र मागणीप्रमाणे पाणी सोडून पावसाळ्यापूर्वीच रखरखत्या उन्हात अर्थात मेमध्ये धरण कोरडे ठणठणीत करणे हे कितपत योग्य आहे? वरिष्ठ स्तरावर याचा विचार करून शिल्लक पाण्याचे योग्य ते नियोजन करणे तसेच वारणा पट्ट्यातील नागरिकांनीही भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेऊन वारणेच्या पाण्याचा जाब विचारणे गरजेचे आहे. अन्यथा कधी नव्हे ते वारणा पट्ट्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.