भय इथले संपत नाही... सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनीत धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:42+5:302021-07-31T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगलीत कृष्णा नदीची पातळी पुन्हा ४२ फुटांपर्यंत जाण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोयना, वारणा धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगलीत कृष्णा नदीची पातळी पुन्हा ४२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्तनगर, काकानगरमधील नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांनी घराची स्वच्छता सुरू केली होती. त्यात पुन्हा पुराचे पाणी येणार असल्याने नागरिक हताश झाले आहेत.
पाच दिवसांपूर्वीच्या पुराने निम्मी सांगली पाण्याखाली गेली होती. आता पाणी ओसरल्याने नागरिकांनी दुकाने, घरांची स्वच्छता सुरू केली आहे. नदीकाठ, शेरीनाल्याच्या परिसरातील घरांत दहा ते बारा फूट पाणी होते. पाणी ओसरल्यानंतर नागरिक घरी परतू लागले आहेत. घरात फूट ते दीड फूट चिखल झाला आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात चिखल आहे. महापालिकेकडून स्वच्छता सुरू आहे. अशात कोयना धरणातून ५० हजार व वारणा धरणातून १४ हजार क्युसेस विसर्ग सुरू केल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत.
सांगलीत कृष्णानदीची पाणीपातळी ४० ते ४२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या नदीपात्रात ३६ फूट पाणी आहे. त्यातच सूर्यवंशी प्लाॅट, काकानगर या परिसरातील काही घरे अजूनही पाण्याखालीच आहेत. मगरमच्छ काॅलनीतील पाणी ओसरले असले तरी नदीची पाणीपातळी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरणार आहे.
चौकट
कर्नाळ रस्त्यावर जलपर्णी
शहरातील कर्नाळ चौकी ते शिवशंभो चौक हा रस्ता अजूनही पाण्याखाली आहे. या रस्त्यावर जलपर्णी वाहून आली आहे. रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. जलपर्णीबरोबरच चिखलाचेही साम्राज्य आहे. त्यात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास हा रस्ता आणखी काही काळ बंदच ठेवावा लागणार आहे.
चौकट
शामरावनगर पाण्याखाली
शामरावनगरमधील पुराचे पाणी ओसरले आहे. बहुतांश रस्ते खुले झाले आहेत; पण मोकळे प्लाॅट व सखल भागात पुराचे पाणी साचून आहे. गतवर्षी पाण्याच्या उपशासाठी मोटारी लावल्या होत्या. तरीही महिनाभर पाणी हटलेले नव्हते. यंदाही तीच परिस्थिती आहे.