बारावीच्या परीक्षा तोंडावर, तरीही विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमाणपत्रे नाहीत; ग्रेस गुण बुडण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:27 PM2024-01-31T16:27:37+5:302024-01-31T16:28:14+5:30
क्रीडा विभागाचा सावळा गोंधळ
विकास शहा
शिराळा : जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला बराच कालावधी लोटला, तरी अद्याप खेळाडूंना प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. यामुळे दहावी, बारावीतील खेळाडूंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विद्यार्थी खेळाडूंना या प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेत ग्रेस गुण दिले जातात. पण प्रमाणपत्राअभावी ते गुणांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनात गोंधळाची स्थिती होती. खूपच विलंबाने शासनाने स्पर्धांना मंजुरी दिली. त्यानुसार सप्टेंबरनंतर त्या झाल्या. शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा स्तरावरून विभागीय स्तरावर व पुढे राज्यस्तरावर स्पर्धा झाल्या. या स्पर्धा संपून वर्ष संपत आले, तरी यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.
बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहेत. त्यानंतर दहावीच्याही होतील. त्यामुळे प्रमाणपत्र तातडीने मिळण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी खेळाडू ग्रेस गुणांना मूकण्याची भीती आहे. खेळाडूंना गुण मिळण्यासाठी शाळांकडून परीक्षा मंडळाकडे प्रस्ताव वेळेत सादर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रमाणपत्राची गरज आहे.
किती मिळतात गुण?
सहावी ते दहावी किंवा सहावी ते बारावीमधील खेळाडूला जिल्हास्तर प्रावीण्यासाठी ५ गुण मिळतात. विभागस्तर प्रावीण्यासाठी १०, राज्यस्तर प्रावीण्यासाठी १२ ते १५, राष्ट्रीयस्तर प्रावीण्यासाठी २० गुण मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ गुण दिले जातात.
यामुळे झाला विलंब !
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाविषयी राष्ट्रीय पातळीवर पेच निर्माण झाला, त्यामुळे स्पर्धा घेण्यास विलंब झाला. सर्व स्पर्धा एकाच वेळी सुरू झाल्या. तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धा संपेपर्यंत विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे नियोजन सुरू झाले. त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र वितरणास विलंब होत आहे.