बहुसंख्याकवादातून अल्पसंख्याक चिरडले जाण्याची भीती, सांगलीच्या नास्तिक परिषदेतील परिसंवादात वक्त्यांचा सूर
By अविनाश कोळी | Published: September 20, 2023 06:50 PM2023-09-20T18:50:57+5:302023-09-20T18:51:10+5:30
धर्मापेक्षा विवेकी नास्तिक होणे हा चांगला पर्याय
सांगली : धर्म हे विषारी असून ते स्वत:चे व समाजाचेही नुकसान करीत आहे. बहुसंख्याकवादातून अल्पसंख्य चिरडले जाण्याचीही भीती असते. त्यामुळे धर्मापेक्षा विवेकी नास्तिक होणे हा चांगला पर्याय आहे, असा सूर सांगलीच्या नास्तिक परिषदेतील परिसंवादातून उमटला.
नास्तिक परिषदेत ‘नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर सहभागी झाले होते. डॉ. प्रदीप पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवप्रसाद महाजन यांनी प्रास्ताविक केले. लोकेश शेवडे म्हणाले, अनेक जण आपण नास्तिक असल्याचे सांगतात; परंतु खरे नास्तिक कोण हे ओळखता येत नाही. काही जण धर्म-परधर्म, जात-परजात मानतात. कोणत्याही धर्मात परमेश्वर ही कल्पना असतेच. धर्म-परधर्म या पातळीवर न राहता ते परधर्मद्वेषांपर्यंत जातात. अशा ढोंगी लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ते स्युडो नास्तिक असतात. नास्तिक बनण्याची प्रक्रिया सोपी नाही.
‘प्रसार माध्यमात नास्तिकतेची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले, नास्तिक बनणे ही प्रक्रिया आहे. आपण नकारात्मक नास्तिकता स्वीकारतो; पण नकारात्मक नास्तिकताही आस्तिकतेचे प्रतिबिंब असते. प्रसार माध्यमातून नास्तिकेचा प्रचार होत नाही. धर्म मात्र आपसूकपणे मांडले जातात. प्रसार माध्यमातून भगवद्गीता पठणच्या स्पर्धा घेतल्यात जातात. ही प्रवृत्ती आता वाढत चालली आहे.
डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, आपण नास्तिक बनण्यासाठी काय करावे लागेल, हे पाहिले पाहिजे. आपण नास्तिक बनल्यानंतर सर्व गोष्टींना नकार देत असतो. हा नकार देत असताना आपल्याजवळ पर्याय काय आहे, हेही महत्त्वाचे आहे. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व तार्किकता या गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे.
परिषदेत ‘बहुसंख्यावाद व धार्मिक हिंसाचाराला सामोरे जाताना’ या विषयावर तुषार गांधी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पर्यावरणवादी नेते विश्वंभर चौधरी यांनी मते व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केले.
विश्वंभर चौधरी म्हणाले, चार्वाकापासून विवेकवादाला सुरुवात झाली. लोकशाहीमध्ये विवेकवादी होणे हे आव्हान आहे; परंतु विवेकवाद जोपासण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार केला पाहिजे. विज्ञानवाद वाढवत नेल्यास विवेकवाद वाढत जाईल; परंतु आपल्या समाजात विज्ञानवाद रुजविला गेला नाही. त्यामुळे भोंदूगिरी वाढत आहे. परंपरा व धर्माची चिकित्सा झाली पाहिजे.
धर्माला मोकाट स्वातंत्र्य नाही : विश्वंभर चौधरी
आपल्या देशाची राज्यघटना श्रेष्ठ आहे. जगातल्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला नाही. नागरिकाला धर्माचे स्वातंत्र्य आहे; परंतु कोणत्याही धर्माला मोकाट स्वातंत्र्य देण्यात आले नाही, असे मत विश्वंभर चौधरी यांनी मांडले.