विनापरवाना ड्रोनची सांगली जिल्ह्यात धास्ती, नियमावलीचे पालनच नाही

By संतोष भिसे | Published: September 3, 2024 12:39 PM2024-09-03T12:39:04+5:302024-09-03T12:39:23+5:30

चोरट्यांच्या अफवेने गावोगावी तरुणांची गस्त

Fear of unlicensed drones in Sangli district, rules are not followed | विनापरवाना ड्रोनची सांगली जिल्ह्यात धास्ती, नियमावलीचे पालनच नाही

विनापरवाना ड्रोनची सांगली जिल्ह्यात धास्ती, नियमावलीचे पालनच नाही

संतोष भिसे

सांगली : जिल्हाभरात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांच्या अफवा असल्याने गावोगावी तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्याकडून ड्रोन उडवले जात आहेत. पण, सध्या ‘चोरटे परवडले, पण ड्रोनना आवर घाला’, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. धक्कादायक बाब असे खासगी ड्रोन उडविण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, हे कोणाच्याच ध्यानीमनी नाही.

आजमितीला शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. सर्वसामान्यांच्या, तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसतात. लग्नाचे जंगी सोहळे, जाहीर सभा-समारंभांमध्ये डोक्यावरून भिरभिरणारी ड्रोन्स विनापरवानाच असतात. त्याच्या वापरासाठी परवाना घ्यावा लागतो, याबाबत संयोजकही अनभिज्ञ असतात. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी सर्व ड्रोनधारकांना नोटिसा काढल्या होत्या. मात्र, पुढे काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात आहे.

ड्रोनच्या वापराचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसतानाही अनेकजण वापरतात, त्यामुळे अनेकदा अपघातही झालेत. काही वर्षांपूर्वी एका लग्नात थेट वरपित्याच्या डोक्यावरच ड्रोन आदळला होता. जखमी झालेल्या वधुपित्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. एका जाहीर सभेतही अडथळ्यावर आदळून ड्रोन जमीनदोस्त झाला होता. विशेष म्हणजे या सभेला पोलीस बंदोबस्तही होता, तरीही कारवाई झाली नाही.

ड्रोन उडवायचा असेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस खाते आणि महापालिकेचा परवाना सक्तीचा आहे. तसे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनीच काही वर्षांपूर्वी काढले आहेत. पण, ड्रोन म्हणजे कॅमेऱ्याचाच एक भाग असल्याच्या भावनेत पोलिसांसह सारेच परवानगी गृहीत धरतात.

ड्रोन वापरायचा, तर हे पाहा नियम

ड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडविण्यावर निर्बंध आहेत. पोलिसांची व प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. तो उडविण्यासाठी प्रशिक्षत व प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहे. प्रशिक्षण फक्त पुणे आणि दिल्लीत उपलब्ध असल्याने ते टाळण्याकडे कल आहे. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची याविषयी अनेक नियम पाळावे लागतात.

शिराळा, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापुरात ड्रोनची दहशत

शिराळा, पलूस, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या तालुक्यांत रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनची मोठी चर्चा आहे. हे ड्रोन कोण उडवतेय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विनापरवाना ड्रोन उडविल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा स्थानिक पोलिसांनी दिला आहे.


जिल्ह्यात कोठेही पोलिसांचे ड्रोन फिरत नाहीत. ड्रोन फिरविण्याविषयी शासनाकडून कोणालाही अधिकृत पत्र मिळालेले नाही. ड्रोन आकाशात दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. रात्री उडविल्या जाणाऱ्या ड्रोनची माहिती घेण्याचे काम आम्ही करीत आहोत. रात्री ड्रोन उडविल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. - संदीप घुगे, पोलिस अधीक्षक.

Web Title: Fear of unlicensed drones in Sangli district, rules are not followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.