मोहिनी विद्येचा वापर, जीवितास धोका असल्याची भीती घालत दागिन्यांवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:44 PM2022-03-11T18:44:13+5:302022-03-11T18:44:55+5:30

धोका टाळण्यासाठी तुमचे मंगळसूत्र व गंठण घेऊन येण्यास सांगत दागिन्यावर पूजा करतो असे सांगून चोरट्याने दागिने आपल्या ताब्यात घेत पोबारा केला

Fearing for his life he attacked the jewelry in Islampur Sangli district | मोहिनी विद्येचा वापर, जीवितास धोका असल्याची भीती घालत दागिन्यांवर मारला डल्ला

मोहिनी विद्येचा वापर, जीवितास धोका असल्याची भीती घालत दागिन्यांवर मारला डल्ला

Next

इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनीतील एका महिलेवर मोहिनी विद्येचा प्रयोग करतानाच पती आणि मुलीच्या जीवितास धोका असल्याची भीती घालत अज्ञात चोरट्याने साडेतीन तोळे वजनाचे दीड लाखाचे सोने घेऊन पोबारा केला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदकुमार भोसले हे बँक अधिकारी मंत्री कॉलनीत राहतात. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास भगवी वस्त्रे परिधान करून हातात ग्रंथ आणि जपमाळ घेऊन हा चोरटा भोसले यांच्या घरी आला. यावेळी त्यांच्या पत्नी अनिता भोसले यांनी घरी कोणी नाही असे सांगितले.

मात्र तरीही या चोरट्याने भक्त असल्याचा बहाणा करत वर्गणी मागितली. अनिता भोसले यांनी ५१ रुपये दिल्यानंतर या चोरट्याचे समाधान झाले नाही.

त्याने घरासमोर बैठक मारत तुमच्या पतीचे अपघाती निधन होणार आहे. तुमच्या मुलीच्या जीवितास धोका आहे, अशी भीती दाखवली. हा धोका टाळण्यासाठी तुमचे मंगळसूत्र व गंठण घेऊन या, असे सांगताच भोसले या घरामध्ये जाऊन दागिने घेऊन आल्या. या दागिन्यावर पूजा करतो असे सांगून चोरट्याने दागिने आपल्या ताब्यात घेतले.

त्याचवेळी भोसले यांच्याकडे रुद्राक्ष देत हे देवघरामध्ये ठेवा, आत जाताना पाठीमागे वळून बघायचे नाही असे सांगितले. भोसले या रूद्राक्ष घेऊन आत जाताच या चोरट्याने दागिने घेऊन पलायन केले.

गुन्हा नाही फक्त तक्रार, पोलीस करणार प्रबोधन

हा प्रकार घडल्यानंतर नंदकुमार भोसले हे पोलीस ठाण्यात गेले होते. तेथे त्यांनी गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी केवळ तक्रार घेत अशा भुरट्या चोरट्यांकडे दुर्लक्षच केले. तसेच मंत्री कॉलनी परिसरात नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी बैठक घेऊ, असा सल्ला दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली.

Web Title: Fearing for his life he attacked the jewelry in Islampur Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.