‘बीएएमएस’च्या प्रवेश प्रक्रियेत शुल्क निश्चितीचा गोंधळ; पालक, विद्यार्थी संभ्रमात 

By अविनाश कोळी | Published: September 9, 2024 01:31 PM2024-09-09T13:31:25+5:302024-09-09T13:31:42+5:30

महाराष्ट्रातील केवळ 'इतक्या' महाविद्यालयांकडून शुल्क जाहीर

Fee fixation confusion in BAMS admission process | ‘बीएएमएस’च्या प्रवेश प्रक्रियेत शुल्क निश्चितीचा गोंधळ; पालक, विद्यार्थी संभ्रमात 

‘बीएएमएस’च्या प्रवेश प्रक्रियेत शुल्क निश्चितीचा गोंधळ; पालक, विद्यार्थी संभ्रमात 

अविनाश कोळी

सांगली : अभ्यासक्रमाचे शुल्क न ठरवताच महाराष्ट्रातील बीएएमएस, बीएचएमएसच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडाला आहे. महाराष्ट्रातील ९३ खासगी महाविद्यालयांपैकी केवळ १७ आयुर्वेद महाविद्यालयांची फी शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाने जाहीर केली आहे. यातील केवळ दहा महाविद्यालयांनीच शुल्क रचना संकेतस्थळावर जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम कसा भरायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रवेश प्रक्रिया जाहीर होतानाच सर्व महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्क, विकास शुल्क, या व्यतिरिक्त वसतिगृह, मेस व इतर शुल्क रचना संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. जेणेकरून पालकांना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार महाविद्यालयाची निवड करता येईल.

आयुष अभ्यासक्रमांसाठी राज्य कोट्यासाठीची पहिल्या फेरीची पसंती नोंदणी प्रक्रिया जाहीर झाली आहे. १० ते १२ सप्टेंबरपर्यंत पसंती नोंदणीची मुदत असून, १४ सप्टेंबरला पहिली निवड यादी जाहीर होईल. १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणाार आहे. अशा परिस्थितीत शुल्क निश्चित नसल्याने महाविद्यालय निवडीचा गोंधळ उडाला आहे.

महाराष्ट्रातील महाविद्यालये व जागा

अभ्यासक्रम आस्थापना - महाविद्यालये - जागा
बीएएमएस शासकीय - २२ - १८१२
बीएएमएस खासगी - ९३  -  ६४८०
बीएचएमएस शासकीय - १  - ६३
बीएचएमएस खासगी - ६० - ४९६५

 यंदा शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाने अनेक महाविद्यालयांच्या फीला मंजुरी दिलेली नाही. अनेक महाविद्यालयांनी यावर्षी वाढीव फीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे नेमकी किती फी वाढणार, हे स्पष्ट नाही. प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना याचा भुर्दंड बसू शकतो. याशिवाय कॅटेगरीनुसार किती फी बसेल हे महाविद्यालयांनी स्पष्ट करणे आवश्यक - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक

Web Title: Fee fixation confusion in BAMS admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.