राष्ट्रीय जाहिरातदिनी मान्यवरांचा सत्कार
By admin | Published: October 14, 2015 11:19 PM2015-10-14T23:19:32+5:302015-10-15T00:35:11+5:30
शेखर गायकवाड : जाहिरात क्षेत्राने नव्या पिढीला संवेदनशील बनवावे
सांगली : गेल्या पाच-सहा महिन्यात जिल्हा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा कारागृहास भेट दिली. त्यावेळी २०-२० वर्षांचे तरुण गुन्हेगारीकडे जास्त वळल्याचे दिसून आले. हे चिंताजनक आहे. जिल्हा कारागृहात ३८० कैद्यांपैकी १०८ जण खुनाचे गुन्हेगार आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. सांगली जिल्ह्याचा क्राईम रेट इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. प्रसारमाध्यमे आणि जाहिरात क्षेत्राने नवीन पिढीमध्ये संवेदनशीलता आणली पाहिजे. आज जाहिरात व माध्यमांमधील तपस्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडील कला ही दैवी देणगीच आहे. माणसाने पिढीगणिक प्रगती करणे अपेक्षित आहे. मात्र तसे दिसत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले. राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त जाहिरात एजन्सीज्च्या ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांच्यावतीने जाहिरात व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड बोलत होते.सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार अरुण नाईक म्हणाले, आजच्या काळात जाहिरातीचे क्षेत्र प्रभावी बनत आहे. त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जाहिरात ही आज व्यवसाय वृद्धीच्यादृष्टीने गरज बनली आहे. यावेळी कलाभुवनचे तात्यासाहेब वेदपाठक, ज्येठ पत्रकार बापूराव खराडे, ज्येष्ठ पत्रकार अरुण नाईक, मीना आर्टस्चे सुधीर व दिलीप गोखले, आर्ट सेंटरचे शरद आपटे यांचा सत्कार करण्यात आला.
‘फेम’चे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल सदस्य महेश कराडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘आसमा’चे उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ यांनी आभार मानले. यावेळी ‘पाणी वाचवा’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन चतुरंग अॅडव्हर्टायझिंगचे महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, नुपूर अॅडस्चे उमेश देसाई, प्रमोद गोसावी, चौफेर क्रिएशनचे अमोल मद्वाण्णा, प्रतिसाद अॅडव्हर्टायझिंगचे प्रकाश हुलवान, सुनील बेलेकर, अॅड सेंटरचे अमित आपटे, मंजुषा आपटे, गणेश अॅडस्चे धनंजय गाडगीळ, सन अॅडव्हर्टायझिंगचे सुधीर अनंतपूरकर, आदर्श अॅडस्चे भालचंद्र लिमये, विजय पब्लिसिटीचे विजय पडियार, रिसोेर्सेसचे राजेश शहा, एम. एम क्रिएशनचे अनिरुद्ध गुमास्ते यांनी केले. यावेळी जाहिरात, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जाहिरात दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी डावीकडून पहिल्या ओळीत धनंजय गाडगीळ, दिलीप गोखले, महेश कराडकर, उमेश देसाई, राजेश शहा. त्यानंतर खालील बाजूस प्रमोद गोसावी, सुधिर गोखले, बा. द. खराडे, अरुण नाईक, तात्यासाहेब वेदपाठक, शरद आपटे .