Sangli: कुची येथे निर्जनस्थळी स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:07 PM2024-12-04T16:07:48+5:302024-12-04T16:08:48+5:30
कवठेमहांकाळ / घाटनांद्रे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका ढाब्याजवळील एका निर्जनस्थळी अंदाजे आठ ते पंधरा ...
कवठेमहांकाळ / घाटनांद्रे : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका ढाब्याजवळील एका निर्जनस्थळी अंदाजे आठ ते पंधरा दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत तत्काळ कवठेमहांकाळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कुची (ता. कवठेमहांकाळ) गावापासून उत्तरेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका ढाब्याच्या पश्चिमेस एका निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवसाचे नवजात अर्भक सापडले. ही घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.
त्यानंतर नवजात अर्भक प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कवठेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली येथे बालसंगोपन विभागाकडे पाठविले आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली असून, अधिक तपास कवठेमहांकाळ पोलिस करत आहेत.
अज्ञात दाम्पत्याने सोडल्याची शक्यता?
राष्ट्रीय महामार्गावर कुची गावापासून काही अंतरावर या अर्भकाच्या वरील भागाचे ओठ नसल्याने या अर्भकाला अज्ञात दाम्पत्य जाणूनबुजून येथे सोडून गेले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.