महिला पोलिसांनी सायबर गुन्ह्यांचाही अभ्यास करावा
By admin | Published: June 1, 2016 12:10 AM2016-06-01T00:10:14+5:302016-06-01T00:56:03+5:30
रवींद्रकुमार सिंंघल : तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभ
तासगाव : तंत्रज्ञानासोबत गुन्हेगारीचे तंत्रही बदलत आहे. त्यामुळे महिला पोलिसांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात सायबर गुन्ह्यांचाही अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. संघटनकौशल्याचा वापर करुन पोलिस खात्याचे कामकाज उत्कृष्टपणे पार पाडावे, असे आवाहन प्रशिक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंंघल यांनी केले.
तुरची (ता. तासगाव) येथे मंगळवारी महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पोलिस प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्या सत्रातील महिला पोलिस शिपायांचा दीक्षांत समारंभ सिंंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी, प्रशिक्षण केंद्राचे माजी प्राचार्य डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलिस उपअधीक्षक मा. शं. शिंंदे, प्रभारी प्राचार्य वि. तु. पांढरपट्टे उपस्थित होते.
डॉ. सिंंघल म्हणाले, पोलिस दलाच्या ब्रीदवाक्यास शोभेल, अशा पध्दतीचीच कामगिरी महिला शिपायांनी करावी. पोलिसांची सर्व कामे सामुदायिक स्वरुपाची असतात. त्यामुळे उत्कृष्ट संघटनकौशल्य आत्मसात करुन काम करावे. पालकांनीही प्रशिक्षणार्थी महिला पोलिस शिपायांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवावी.
डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी अहवाल वाचन केले. यावेळी डॉ. सिंंघल यांच्याहस्ते महिला पोलिस शिपाई प्रशिक्षणार्र्थींनी तयार केलेल्या खुल्या व्यासपीठाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला. निरीक्षण व्हॅनमधून प्रशिक्षणार्थींना शपथ देण्यात आली. निशाण टोळीच्या संचलनाच्या राष्ट्रीय ध्वजाचे नेतृत्व प्रियंका झाल्टे यांनी केले, तर महाराष्ट्र पोलिस ध्वजाचे नेतृत्व आरती थिटे यांनी केले. प्रशिक्षणार्थी संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर जितू चौधरी यांनी केले. (वार्ताहर)
तुरची येथे मंगळवारी महिला पोलिस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंंघल यांच्या उपस्थितीत पार पडला.