ग्रामीण भागात महिला कुस्तीला ‘अच्छे दिन !’ वीसहून अधिक महिला कुस्तीगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:34 PM2018-03-06T23:34:40+5:302018-03-06T23:34:40+5:30

 Female wrestling 'good days' in rural areas! More women wrestlers than weeas | ग्रामीण भागात महिला कुस्तीला ‘अच्छे दिन !’ वीसहून अधिक महिला कुस्तीगीर

ग्रामीण भागात महिला कुस्तीला ‘अच्छे दिन !’ वीसहून अधिक महिला कुस्तीगीर

googlenewsNext
ठळक मुद्देगावोगावच्या मैदानात आयोजन : खेळाडूंना प्रोत्साहन;

सहदेव खोत।
पुनवत : ग्रामीण भागात महिलांच्या कुस्ती स्पर्धांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. गावोगावच्या यात्रांमध्ये कुस्ती मैदानात महिलांच्या कुस्त्या खेळविल्या जात आहेत. या लढतींना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिराळा तालुक्यात वीसहून अधिक महिला कुस्तीगीर आहेत. त्यांना कुटुंब, तसेच नागरिकांकडून प्रोत्साहन मिळू लागले आहे.

सध्या गावोगावच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. यात्रा म्हटल्या की, कुस्ती मैदाने आलीच. ग्रामीण भागात अजूनही कुस्ती शौकिनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कुस्ती मैदाने मोठ्या उत्साहात होतात. कुस्तीतून अनेक चांगले खेळाडू तयार होत असल्याने गावागावांत अजूनही तालमी टिकून आहेत.

कुस्ती मैदानात पुरुषांच्या कुस्त्यांबरोबरच आता महिलांच्या कुस्त्यांचेही आयोजन होऊ लागले आहे. त्याला महिला कुस्तीगिरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. शिराळा तालुक्यात श्वेता पाटील (फुपेरे), मेघा चव्हाण (आरळा), पूजा चव्हाण (कोकरूड), पूजा पाटील (माळेवाडी), श्वेता पवार (मोरेवाडी), अस्मिता पवार (मांगरूळ), ऋतुजा जाधव (भाटवडे), स्वरांजली खोत (डोंगरवाडी), अनिता कुंभार (खुजगाव) अशा उदयोन्मुख महिला कुस्तीगीर तयार होत असून, वारणा पट्ट्यात यंदा आतापर्यंत अंत्री, चिंचोली, आरळा, भेडसगाव, खुजगाव, रेड, रिळे, उंडाळे, आदी गावांच्या मैदानात महिला कुस्त्यांचे आयोजन केले आहे.

तालुक्यातील या कुस्तीगीर आपल्या गावच्या तालमीत, तसेच कोकरूड व कोल्हापूर येथील कुस्ती केंद्रात कुस्तीचे धडे गिरवित आहेत. या कुस्तीगिरांना पालकांचेही मोठे पाठबळ मिळत आहे. एकंदरीत गावाकडील कुस्ती मैदानात अनेक ठिकाणी महिला कुस्त्यांचे आयोजन होत असून, यातून अनेक युवा महिला कुस्तीगीर तयार होणार आहेत.

मुलींना प्रोत्साहन द्यावे
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, फुपेरचे सर्जेराव पाटील म्हणाले, सध्या खेळाला फार महत्त्व आहे. त्यातच कुस्ती हा देशातील प्रमुख खेळ आहे. पालकांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलींनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. महिला कुस्तीगीरही देशाला आॅलिम्पिक स्पर्धेतील पदके मिळवून देऊ शकतात. हा आदर्श युवा कुस्तीगिरांनी घेतला पाहिजे.

Web Title:  Female wrestling 'good days' in rural areas! More women wrestlers than weeas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.