निमणी यात्रेमध्ये दोन गटांत मारामारी
By admin | Published: April 24, 2016 12:13 AM2016-04-24T00:13:11+5:302016-04-24T00:13:11+5:30
गावात तणाव : पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांचा ठिय्या; परस्परविरोधी तक्रार
तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथे हनुमान जयंतीनिमित्त सुरू असलेल्या यात्रेत शुक्रवारी रात्री तमाशा सुरू असताना दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. हाणामारीत दोन्ही गटांतील दोघे जखमी झाले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दिवसभर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याची नोंद झाली नव्हती. या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती.
निमणी येथे शुक्रवार आणि शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले होेते. यात्रेच्या पहिल्याच दिवशी रात्री तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात रात्री एक वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाचे निमित्त करून निमणी आणि पाचवा मैल येथे राहणाऱ्या दोन गटांत बाचाबाची झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणचा वाद मिटवून संबंधितांना तेथून बाहेर घालविले. त्यानंतर बसस्थानक चौकात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. या हाणामारीत दोन्ही गटांचे काही कार्यकर्ते जखमी झाले. हाणामारीच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हाणामारी थांबवून जखमींना तासगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथून एकास मिरज आणि दुसऱ्यास सांगली येथील रुग्णालयात नेले.
शुक्रवारी रात्री झालेल्या मारामारीची फिर्याद देण्यासाठी शनिवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले होते. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवाराला गर्दीचे स्वरूप आले होते. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आल्यानंतर ठाण्याच्या आवारातच दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत तक्रार दाखल करण्यावरून वादावादी झाली. एका गटाने यात्रा समितीचे अध्यक्ष आर. डी. पाटील यांच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला झाला असून, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजताच गावातील दुकाने बंद ठेवून सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस ठाण्यात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून तक्रार दाखल झाली नाही.
राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
निमणी येथे दोन गटांत झालेल्या मारामारीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून झाल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती. गावपातळीवर झालेल्या मारामारीत तालुक्यातील नेत्यांकडून हस्तक्षेप करून या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याची तसेच पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा होती.
प्रकरण मिटविण्याच्या हालचाली
दोन गटांतील मारामारीनंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दिवसभर पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मारला होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांत फिर्याद दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. मात्र, रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल झाली नाही.
जखमींवर सांगलीत उपचार
मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. राहुल हिंदुराव कांबळे (वय २३) व अजित रमेश शिराळे (२२) अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.