भोसेत दारूबंदीसाठी महिलांची वज्रमूठ
By Admin | Published: July 5, 2017 12:15 AM2017-07-05T00:15:22+5:302017-07-05T00:15:22+5:30
भोसेत दारूबंदीसाठी महिलांची वज्रमूठ
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : एकीची वज्रमूठ बांधलेल्या भोसे (ता. मिरज) येथील रणरागिणींनी दारूची बाटली आडवी करण्याबरोबरच गावातून मटक्यासह अवैध व्यवसायही हद्दपार करण्याचा निर्धार मंगळवारी विशेष महिला ग्रामसभेत केला. दबावाला बळी न पडता हा लढा देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
भोसे येथे दारू व अवैध व्यवसाय बंदीसाठी सरपंच सुलाताई कट्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच कमल पाटील, पोलिस पाटील शोभाताई कदम यांच्या उपस्थितीत विशेष महिला ग्रामसभा पार पडली. मनोज पाटील यांनी प्रास्ताविक केले. दारूबंदी व अवैध धंद्यांना विरोधासाठी महिलांची मते जाणून घेण्यात आली. कांचन कोळी यांनी, दारूमुळे आपले कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले, याची कहानी कथन केली. तो त्रास इतर भगिनींच्या वाट्याला येऊ नये यासाठी गावात दारूबंदी आवश्यक आहे. आपण या लढ्याचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोळी यांच्यासोबत इतर त्रस्त महिलांनीही दारूबंदी करण्याचा निर्धार व्यक्त केला. दारूची बाटली आडवी करण्याबरोबरच गावातून अवैध व्यवसायही हद्दपार करण्याचा महिलांनी ग्रामसभेत निर्धार केला.
या लढ्याचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम, अनिता कदम, मनोज पाटील यांनी यावेळी दिले. या मोहिमेसाठी अकरा महिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दारूबंदीसाठी गावात सह्यांची मोहीम राबविणार आहे.
गावात परमिट रूमला नव्याने परवाना व नूतनीकरण करण्यात येऊ नये, परमिट रूमचे बांधकाम थांबविण्यात यावे, विनापरवाना बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणीही महिलांनी केली. परवान्याबाबत ग्रामविकास अधिकाऱ्यास जाबही विचारण्यात आला. यावेळी परवाना दिला नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला.
ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य गौतम होवाळे, नेमिनाथ चौगुले, अमोल पाटील, प्रकाश चौगुले यांच्यासह दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.
...आणि तिला अश्रू अनावर झाले
दारूमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराची कहाणी मांडताना कमल माने या महिलेला अश्रू अनावर झाले. व्यसनाने पतीचे निधन झाले, दोन मुलेही व्यसनाधिन आहेत. याचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची वेळ आल्याने दारूबंदी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी अश्रू पुसत केल्याने महिलांचे डोळेही पाणावले.
पोलिस हाजीर हो!
शाळेजवळ भर चौकात अवैध देशी दारू विक्री व मटका व्यवसाय सुरू असताना, तो पोलिसांना का दिसत नाही, असा सवाल करीत, पोलिसांना सभेत बोलवा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली. तेथे उपस्थित असलेले भोसे भागाचे हवालदार कांबळे यांना बोलाविण्यात आले. त्यांना जाब विचारला. हवालदार कांबळे यांनी, सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आश्वासन दिले.