रेल्वेच्या दक्षता पथकाचा कोल्हापूरसह मिरज स्थानकात छाप्याचा फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:01 PM2017-10-13T19:01:38+5:302017-10-13T19:03:53+5:30
मिरज : दिवाळी सुटीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल असल्याने तिकिटांचा काळाबाजार जोमात सुरू आहे
मिरज : दिवाळी सुटीच्या हंगामात सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल असल्याने तिकिटांचा काळाबाजार जोमात सुरू आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कोल्हापूर व मिरज स्थानकात छापा टाकून आरक्षण विभागातील कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. कोल्हापुरात एका महिला कर्मचाºयाकडे जादा रक्कम सापडल्यानंतर प्रकरण मिटविण्यात आले. दक्षता विभागाने छाप्याचा फार्स केला, मात्र तिकीट एजंटांची धावपळ उडाली होती.
रेल्वेच्या आरक्षित तात्काळ तिकिटांना मोठी मागणी असल्याने तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रवाशाला ओळखपत्राची सक्ती, तात्काळ तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र वेळ, अशा उपाययोजना रेल्वे प्रशासनाने केल्यानंतरही रेल्वे कर्मचाºयांच्या मदतीने आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरूच आहे. स्थानकातील तिकीट खिडक्यांवर एजंट रांगा लावत आहेत. मिरज, सांगली व कोल्हापूर स्थानकात अनधिकृत तिकीट एजंटांची चलती आहे. रेल्वे तिकीट खिडकीवर आरक्षण केंद्रातील कर्मचाºयांच्या मदतीने तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे.
दिवाळी सुटीच्या हंगामात तात्काळ तिकिटांचा काळाबाजार जोरात असल्याने मध्य रेल्वेच्या पुणे येथील दक्षता पथकाने कोल्हापूर स्थानकात आरक्षण केंद्रात छापा टाकून कर्मचाºयांची तपासणी केली. यावेळी एका महिला कर्मचाºयाकडे तिकीट विक्रीच्या रकमेपेक्षा जादा रक्कम सापडली. याप्रकरणी संबंधित कर्मचारी महिलेचे तिकिटांचा काळाबाजार करणाºया एजंटांशी संबंध असल्याच्या मिरजेतील तक्रारीमुळे तिची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. दक्षता विभागाच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे दोन दिवस गायब झालेले अनधिकृत तिकीट एजंट शुक्रवारी पुन्हा तिकीट खिडक्यांवर परतले.
पैसे विसरल्याची बतावणी
कोल्हापुरात महिला कर्मचाºयाकडे तिकीट विक्री रकमेपेक्षा जादा रक्कम सापडल्यानंतर तिच्यावर कारवाईऐवजी एका प्रवाशाचे परत द्यावयाचे पैसे विसरले असल्याचे कारण दाखविण्यात आले. संबंधित प्रवाशास पाचारण करून पैसे परत घेण्यास विसरल्याचा जबाब नोंदविण्यात आला. दक्षता विभागाच्या अधिकाºयांनी तडजोडीने प्रकरण मिटविल्याची माहिती मिळाली. मिरजेतही तिकीट आरक्षण केंद्राची तपासणी करून, मिरजेत कोणाकडे जादा रक्कम सापडली नसल्याचे सांगत दक्षता विभागाच्या छाप्याचा फार्स पार पडला.