व्यापाऱ्यांचे सोमवारपासून उपोषण
By admin | Published: December 13, 2014 12:03 AM2014-12-13T00:03:30+5:302014-12-13T00:15:22+5:30
एलबीटीला विरोध : महापालिकेसमोर आंदोलन
सांगली : एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) वसुलीसाठी महापालिका आयुक्तांनी फौजदारीची कारवाई सुरु केली आहे, याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्यावतीने सोमवारपासून (१५ डिसेंबर) महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समीर शहा, विराज कोकणे, आप्पा कोरे, विरेन शहा आदींनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनाचे नेतृत्व व्यापारी असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष मोहनदास गुरुनानी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एलबीटीच्या वसुलीसाठी आयुक्तांनी आता व्यापाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु केली आहे. राज्य शासन यासंदर्भात विचार विनीमय करण्याची प्रक्रीया सुरु केली असताना ही कारवाई अशोभनीय आहे. आयुक्त इतके कायदेशीर वागणार असतील तर त्यांनी वसंदादा बँकेतील महापालिकेच्या ठेवींची वसुली करुन दाखवावी. याकडे दुर्लक्ष करुन ते काँग्रेसची पाठराखण करीत आहेत. एलबीटी वसुलीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व व्यापारी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व प्रमुख शहरातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यानंतरही कारवाई न थांबल्यास महापालिका क्षेत्रातील व्यापार बेमुदत बंद करण्यात येईल.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनदास गुरुनानी हे रविवारी सांगलीत येणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली रात्री आठ वाजता व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सतरा महापालिकांचे प्रतिनिधी येणार
एलबीटी वसुलीच्या निषेधार्थ सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असून पहिल्या दिवशी एलबीटी लागू करण्यात आलेल्या राज्यातील १७ ड वर्ग महापालिकेतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या दिवशी ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी उपस्थित राहणार आहेत.