तापामुळे येणारे झटके-बाल स्वास्थ

By Admin | Published: March 1, 2017 12:15 AM2017-03-01T00:15:08+5:302017-03-01T00:15:08+5:30

छोट्या मुलांना ताप येणे हा वरचेवर येणारा प्रसंग असल्याने ज्यांच्या घरी लहान मुले आहेत,

Fever due to fever - Child health | तापामुळे येणारे झटके-बाल स्वास्थ

तापामुळे येणारे झटके-बाल स्वास्थ

googlenewsNext

दीड वर्षाच्या राहुलला त्याचे आई-वडील व नातेवाइकांनी घाईघाईने बालरोगतज्ज्ञांकडे आणले. त्याला चांगलाच ताप होता. राहुलला फिट आल्यासारखे झटके येत होते. अशा स्वरुपाचा पहिलाच प्रसंग असल्याने याप्रसंगी काय करायचे असते याची पालकांंना मुळीच कल्पना नव्हती; मात्र बालरोगतज्ज्ञांसाठी असा प्रसंग आठ-पंधरा दिवसांतून एकदा तरी येतच असतो. आज या आजाराची माहिती करून घेऊया.साधारणपणे पाच वर्षांखालील पाच ते सहा टक्के मुले पटकन वाढणाऱ्या तापासाठी अतिसंवेदनशील असतात. त्यांना जर अल्पकालावधीमध्ये ताप पटकन वाढला तर झटके येऊ शकतात. त्याला तापामुळे आलेले झटके असे म्हणतात. झटका हा आजार नसून, ते आजाराचे एक चिन्ह आहे. क्वचित प्रसंगी मेंदूज्वर, मेंदूचा जंतूसंसर्ग, मेनिंजायटीस, जपानी मेंदूज्वर, मेंदूचा क्षयरोग अशा गंभीर स्वरुपाच्या आजारामध्येही ताप व झटके येऊ शकतात. तथापि, मेंदूचा जंतूसंसर्ग झाला नसताना केवळ शीघ्रगतीने वाढत जाणाऱ्या तापामुळे येणाऱ्या झटक्यांना तापामुळे येणारे झटके असे म्हणतात. बऱ्याच मुलांना असे झटके येत असतात. अशा मुलांच्या भावंडांना, त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या लहानपणी असे तापातील झटके येत असल्याचा इतिहास दिसून येतो. या तापामुळे येणाऱ्या झटक्यामुळे मुलाच्या मेंदूवर कायमस्वरूपी दुष्परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे अशा झटक्यांबाबत फार काळजी करण्याचे कारण नाही. अशा प्रसंगी पालकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती असल्यास अनावश्यक चाचण्या, हॉस्पिटलमधील अ‍ॅडमिशन्स व औषधोपचार टाळता येणे शक्य आहे.
छोट्या मुलांना ताप येणे हा वरचेवर येणारा प्रसंग असल्याने ज्यांच्या घरी लहान मुले आहेत, अशा पालकांनी घरामध्ये कायम थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. ताप आल्यावर तो दर तीन-चार तासाला थर्मामीटरने मोजून पाहावा. ताप १०० अंशांच्या पुढे गेल्यास मुलाच्या वयानुसार तापाच्या औषधाचा प्रमाणित डोस देऊन ताप कमी करता येईल. दोन दिवसांनंतर ताप राहिल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाच्या कारणांचा शोध घेऊन पुढील उपचार देता येईल. त्यातून बाळाला झटके आल्यास घाबरून जाऊ नये. बहुतांशवेळी असा झटका दोन ते पाच मिनिटांमध्ये विना उपचारदेखील थांबतो. मुलाला एका कुशीवर वळून ठेवल्यास त्याच्या तोंडामधील फेस श्वसननलिकेमध्ये अडकून गुंतागुंत होणार नाही. झटका थांबल्यानंतर अर्धा पाऊण तास बाळ झोपेत वा गुंगीत असते. त्यानंतर ते पूर्ण जागे होऊन खेळू लागते. झटका आला असताना डोक्यावर पाणी मारणे, कांदा, चप्पल हुंगविणे, तोंडात बोट, चमचा घालणे असे प्रकार बाळाला धोका उत्पन्न करू शकतात. अशा उपायांचा झटका थांबविण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. अशा प्रसंगी या बाळाला ताबडतोब पळवत डॉक्टरांकडे नेण्याची गरज नाही. कारण बाळ डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत त्याचा झटका थांबलेला असतो. मात्र, झटका थांबल्यानंतर शांतपणे डॉक्टरांकडे जाऊन झटका येण्याची इतर गंभीर कारणे नाहीत ना याची खात्री करावी. एका तापामध्ये झटका आलेल्या बाळाला वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत परत असा झटका येण्याची शक्यता असल्याने पालकांनी जागरूक राहावे.
शरीराच्या ठराविक भागामध्ये येणारे सीमित झटके, १५ मिनिटांपेक्षा प्रदीर्घ काळ येणारे झटके, तापाच्या एकाच कालावधीमध्ये अनेकवार झटके येणे, झटका येऊन गेल्यावर तासाभरानंतरही बाळ गुंगीत असते अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घेणे योग्य ठरेल. हा इतर कारणांमुळे आलेला झटका असू शकतो. बाळाला झटका येणे ही घटनाच मुळी पालकांना घाबरवून टाकण्यास पुरेशी असते. मात्र, याविषयी पालकांना पुरेसे आरोग्य शिक्षण असल्यास अनावश्यक काळजी कमी करता येईल. --- डॉ. मोहन पाटील

Web Title: Fever due to fever - Child health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.