मोजकेच नगरसेवक जोमात, पदाधिकारी कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:02+5:302021-05-09T04:26:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगलीकरांची सत्त्वपरीक्षा सुरू आहे. अशा संकटसमयी लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असा प्रश्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सांगलीकरांची सत्त्वपरीक्षा सुरू आहे. अशा संकटसमयी लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे. महापालिकेतील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक मात्र दिवसरात्र जनतेच्या मदतीला धावून जात आहेत. काहींनी कोविड सेंटर उभारले, तर काहीजण बेड मिळवून देण्यापासून रुग्ण बरे होईपर्यंत फॉलोअप घेत आहेत. पण यात पदाधिकाऱ्यांनी मात्र निराशा केली आहे.
कोरोनाच्या या लढाईत मोजके राजकीय पदाधिकारी कार्यरत आहेत. काहींनी थोड्याफार प्रमाणात धान्य वाटप, इतर मदतीचे इव्हेंट घडवून आणले. याव्यतिरिक्त कुणीही अश्रू पुसायला आले नाहीत. निवडणुकीचा काळ असता तर घराघरात जाऊन मतदारांची डोकी मोजून घेतली असती. पण, सध्या अनेकांनी अंगावर गोधडी लपेटून झोपणे पसंत केले आहे.
तरीही काही नगरसेवकांनी मात्र जीवाची बाजी लावली आहे. अभिजित भोसले सुरुवातीपासूनच यात फ्रंटवर होते. आता त्यांनी ३० बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे. रात्री दोन तीन बाजेपर्यंत ते लोकांच्या मदतीला धावत असतात. कुठे ऑक्सिजनचा सिलेंडर पोहोच कर, तर कुणाला रेमडेसिविर, बेड मिळवून देण्यापर्यंतची कामे ते करत आहेत. केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातूनही त्यांना मदतीसाठी फोन येतात. मंगेश चव्हाण यांनीही ५० बेडचे सेंटर सुरु केले. मनोज सरगर प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घेत आहेत. संतोष पाटील यांनीही कोविड सेंटरसोबतच ऑक्सिजनसाठी धावाधाव करीत आहेत. दुसरीकडे महापौर, उपमहापौर, विविध पक्षाचे गटनेते, समित्यांचे सभापतींनी मंत्री, आमदारांच्या मागेपुढे राहण्यातच धन्यता मानली आहे.
चौकट
आमदार गाडगीळ सक्रिय
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हेही कोरोना काळात सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी एक रुग्णवाहिका महापालिकेला भेट दिली आहे. आरोग्य केंद्रावरील लसीकरण, कोरोना चाचण्यांवरही त्यांचे लक्ष आहे. त्यांच्या कार्यालयातून रुग्णांना मदत केली जात आहे. त्यांच्या प्रयत्नातून काही कोविड केअर रुग्णालये सुरू झाली आहेत.