मोजकेच राजकारणी लढाईत, बहुतांशी सुरक्षित अंतरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:07+5:302021-05-09T04:26:07+5:30
सांगली : मिरज शहरातील माेजकेच राजकारणी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय असून, निम्मे कोरोनापासून सुरक्षित अंतराचा नियम पाळत आहेत. प्रशासनाच्या प्रयत्नांना ...
सांगली : मिरज शहरातील माेजकेच राजकारणी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय असून, निम्मे कोरोनापासून सुरक्षित अंतराचा नियम पाळत आहेत. प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ देत काही राजकारण्यांनी कोविड हॉस्पिटल उभारण्यापासून वैद्यकीय मदत, उपकरणे देण्यासाठीही प्रयत्न चालविले आहेत. तरीही एकूण राजकारण्यांच्या गर्दीत ही संख्या नगण्य आहे.
मिरजेत चमकोगिरी करणाऱ्या, कार्यकर्त्यांची फौज घेऊन फिरणाऱ्या राजकारण्यांची एरवी दिसणारी भाऊगर्दी कोरोनाकाळात गायब झाली आहे. मोजकेच नगरसेवक व राजकारणी रुग्णांना मदतीसाठी धडपडताहेत. नगरसेवक निरंजन आवटी, सुरेश आवटी यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यापासून रुग्णांना बेड मिळवून देण्यापर्यंतची स्वत:ची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यांच्यासह नगसेवक योगेंद्र थोरात, नगरसेविका नर्गिस सय्यद आदी मोजकेच नगरसेवक रुग्णांच्या मदतीसाठी सक्रिय दिसत आहेत. इतर नगरसेवक व राजकारणी नेमके गेले कोठे, असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी व नेते म्हणवणाऱ्यांनी तर कोरोनाकाळात जनतेपासून विलगीकरण करून घेतले आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसची ताकदही याठिकाणी मोठी आहे. तरीही काही मोजके लोक वगळता अन्य पदाधिकारी, नगरसेवकांनी संकटातील नागरिकांपासून दूर राहणे पसंत केले आहे. सांगलीच्या तुलनेने मिरजेतील राजकारण्यांची उदासीनता अधिक आहे.
कुपवाडची परिस्थितीही तशीच आहे. याठिकाणी नगरसेवक शेडजी मोहिते, प्रकाश ढंग हे मोजकेच नगरसेवक वगळता बहुतांश नगरसेवक लोकांपासून सुरक्षित अंतरावर आहेत.
चौकट
आमदार झाले सक्रिय
गेल्या अनेक महिन्यांपासून मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. नुकतेच या संकटकाळात सक्रिय होत त्यांनी शासकीय रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट म्हणून दिली. अन्य भाजपचे पदाधिकारी, नेते मात्र कुठे आहेत, असा सवाल नागरिकांत कायम आहे.
चौकट
निम्मे नगरसेवक बाधित
आ. खाडे यांच्यासह मिरजेतील जवळपास ५० टक्के नगरसेवक कोरोनाबाधित झाले होते. उपचार घेऊन सर्वजण बरे झाले आहेत. तरीही अन्य कोरोना रुग्णांसाठी यातील बहुतांशी लोकांनी काहीही केले नाही.