महामंडळासाठी फिल्डिंग
By admin | Published: November 13, 2015 10:58 PM2015-11-13T22:58:54+5:302015-11-14T00:09:58+5:30
राज्य कार्यकारिणीला साकडे : मंत्रीपद वाटपाकडे जिल्ह्याचे लक्ष
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळांवरील नियुक्त्यांचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे, जिल्ह्यातील इच्छुक नेते चार्ज झाले आहेत. पदांसाठी प्रयत्न करून थकलेल्या या नेत्यांनी पुन्हा प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याचे असलेले अस्तित्व नव्या सरकारच्या कालावधित खंडित झाले आहे. जिल्ह्याला किमान दोन मंत्रीपदे तरी ठरलेली होती. आघाडी सरकारच्या कालावधित याठिकाणी एकाचवेळी चार मंत्रीपदे देण्यात आली होती. केंद्रातील मंत्रीपदही सांगली जिल्ह्याने भूषविले आहे. राज्यातील महत्त्वाची खाती सांगलीच्या वाट्याला असायची. लाल दिव्यांची सवय असलेल्या सांगली जिल्ह्यात अचानक पदांचा दुष्काळ पडला. नव्या सरकारने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीच्या पदरात एकही महत्त्वाचे पद टाकले नाही. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या सहा महिन्यात जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदासाठी प्रचंड मेहनत घेतली. राज्यातील पदाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांना साकडेही घातले होते. पहिल्या विस्तारातही संधी मिळाली नाही म्हटल्यानंतर, हे नेते शांत झाले. सांगलीला आता कधीच पद मिळणार नाही, असा समज करून त्यांनी आशा सोडून दिली.
जिल्ह्यातील वातावरण शांत असतानाच मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगलीला मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट करून टाकले. त्यामुळे निराशाग्रस्त नेत्यांच्या मनात पुन्हा आशेचे कमळ फुलले आहे. महामंडळांवरील नियुक्त्याही त्याचवेळी होणार असल्यामुळे महामंडळासाठी वर्षभरापासून गळ टाकलेल्या नेत्यांचेही चेहरे खुलले. प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यासाठी पुन्हा ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. राज्यभरातून भाजपकडे पक्षांतर्गत २ हजार ५00 इच्छुकांचे अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यात सांगली जिल्ह्यातील सुमारे २५ अर्ज आहेत.
त्यामुळे या सर्वांना संधी देणे शक्य नाही. तरीही सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाबरोबरच महामंडळाचीही लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत, अशाप्रकारची भाकितेही नेतेमंडळीच करीत आहेत. याच भाकितांवर आधारित राजकीय गणिते मांडण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांकडून होणाऱ्या मंत्रीपद वाटपाकडे आता लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यातून २५ अर्ज
प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यासाठी पुन्हा ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. राज्यभरातून भाजपकडे पक्षांतर्गत २ हजार ५00 इच्छुकांचे अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यात सांगली जिल्ह्यातील सुमारे २५ अर्ज आहेत. त्यामुळे या सर्वांना संधी देणे शक्य नाही. तरीही सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाबरोबरच महामंडळाचीही लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.