सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 02:53 PM2020-01-30T14:53:43+5:302020-01-30T14:54:50+5:30
शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.
सांगली : बाजार समितीसाठी शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा हक्क महाविकास आघाडीच्या सरकारने हटविल्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, व्यापारी, हमाल-तोलाईदारच मतदार असतील. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जूनमध्ये होणार आहे. पण, या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी भाजप सरकारने २०१७ मध्ये केलेली सुधारणा महाविकास आघाडीच्या सरकारने रद्द करून पूर्वीप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील काही नेत्यांमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. २०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खा. राजू शेट्टी असे एक पॅनेल, तर विरोधी गटात जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री मदनभाऊ पाटील होते. पतंगराव कदम गटाला बहुमत मिळाल्यामुळे बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व होते. कालांतराने अनेक राजकीय समीकरणे बदलली आणि बाजार समिती खासदार संजयकाका पाटील गटाच्या ताब्यात गेली.
कदम, घोरपडे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या बदलत्या राजकारणाचा विचार करुनच जून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत आघाड्यांची गणिते मांडली जाणार आहेत. संजयकाका यांचा सध्या भाजपचे माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. हे दोन नेते येत्या बाजार समितीच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि कदम गट, मदनभाऊ गटाची काय भूमिका असणार, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.