झेंडूचे मळे फुलले...यंदा बाजारात दरही बहरणार; उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:45 PM2022-09-23T13:45:16+5:302022-09-23T13:45:44+5:30
या फुलांचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे
सांगली : गणरायाने यंदा झेंडू उत्पादकांवर कृपादृष्टी दाखविल्यानंतर देवीचा नवरात्रोत्सवही पावणार आहे. पितृपक्षातच किलोला ४० रुपयांपेक्षा जास्त दर झेंडूला मिळाला असून, नवरात्रोत्सवात व दसऱ्याला चांगला दर मिळण्याची आशा आहे.
कोरोना काळातही झेंडूला चांगला दर मिळाला होता. मागील वर्षी चांगला दर मिळाल्याने यंदा जिल्ह्यातील झेंडूचे उत्पादन वाढले आहे. नवरात्रोत्सवापूर्वी आता झेंडू फुलला असून, त्याची काढणी येत्या काही दिवसांत सुरू होईल. सांगली जिल्ह्यात विविध जातींच्या झेंडूचे उत्पादन केले जाते. जातीनुसार त्यांच्या उत्पादनाची क्षमता ठरलेली असते. तरीही यंदा सरासरी उत्पादन चांगले झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या अपेक्षेने उत्पादन घेतले आहे त्या अपेक्षांची पूर्तता यंदाच्या दसऱ्याला होण्याची उत्पादकांना खात्री आहे.
तालुकानिहाय झेंडू क्षेत्र (हेक्टर)
मिरज ५५
वाळवा ६४
शिराळा ३
तासगाव ४२
कडेगाव ६२
खानापूर ८२
आटपाडी ८०
पलूस १५
जत १०
कवठेमहांकाळ १०
एकूण ४२६ हेक्टर
खानापूर, आटपाडी अग्रेसर
झेंडूच्या उत्पादनात सध्या खानापूर व आटपाडी आघाडीवर असून त्याखालोखाल वाळवा, कडेगाव व मिरज तालुक्यांचा क्रमांक लागतो. दुष्काळी भागातील उत्पादकांनी यंदा उत्पादन वाढविले आहे.
किडीमुळे मोठे नुकसान
यंदा शेतकऱ्यांना दर चांगला मिळण्याची अपेक्षा असतानाही किडीने नुकसान झाले आहे. झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीमुळे काही प्रमाणात उत्पादन घटले आहे.
सणाचे व झेंडूचे महत्त्व
झेंडूच्या फुलांना हिरण्यगर्भपुष्पही म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं. झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. दोन ते तीन दिवस ती कोमेजत नाहीत. या फुलांचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. संस्कृतमध्ये याला स्थूल पुष्प म्हणजेच दिव्य शक्तींसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे.
पितृपक्षातही सध्या दर चांगला आहे. गणेशोत्सवात अपेक्षेप्रमाणे चांगला दर मिळाला. दसऱ्यालाही यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे लागवड क्षेत्र वाढले आहे.- आनंदा माळी, झेंडू उत्पादक