पंधरा दिवसांनंतर बाजार समितीतील सौदे पूर्ववत
By admin | Published: July 20, 2016 11:51 PM2016-07-20T23:51:08+5:302016-07-21T00:48:21+5:30
बेदाण्याची विक्रमी आवक : पाच कोटींहून अधिक उलाढाल
सांगली : राज्य शासनाने काढलेल्या नियमन मुक्तीच्या अध्यादेशाच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या येथील बाजार समितीतील हळद, गूळ व बेदाणा सौद्यांना बुधवारपासून पुन्हा एकदा सुरूवात झाली. पंधरवड्याच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या सौद्यांना व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत सहभाग नोंदविल्याने, पहिल्याच दिवशी मोठी उलाढाल झाली. केवळ बेदाण्याच्या पन्नासहून अधिक गाड्या मालाची आवक झाली होती. चांगल्या प्रतिसादामुळे बुधवारी एकाचदिवशी पाच कोटींहून अधिकची उलाढाल झाली.
राज्य शासनाने ५ जुलैला नियमन मुक्तीबाबत अध्यादेश काढल्यानंतर बाजार समितीतील व्यापाऱ्यांत अस्वस्थता होती. नियमन मुक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत निश्चित मार्गदर्शक सूचना मिळत नसल्याने, गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीतील सौदे बंद होते. यावर सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर सौदे सुरू झाले आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी बेदाण्याची चांगली आवक झाली होती. पन्नास गाड्या मालाची आवक झाली. यास दरही चांगला मिळाला. पिवळ्या बेदाण्यास सरासरी ९० ते १२० रूपये, हिरव्या बेदाण्यास ८० ते १२५ रूपये, तर काळ्या बेदाण्यास ३० ते ६० रुपये असा दर मिळाला. या सौद्यात देशभरातून आलेले व्यापारी सहभागी झाले होते.
बेदाण्याबरोबरच हळद व गुळाचे सौदेही पूर्ववत झाले. सध्या पावसाळ्यामुळे या मालाची आवक मर्यादित असली तरी, आलेल्या मालास समाधानकारक दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यात परपेठ हळदीला सरासरी ८३०० ते ९०५० रूपये प्रती क्विंटल, स्थानिक हळदीला ८ हजार ते १०,३५० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला, तर गुळाला ३४०० ते ४०७० रुपये असा दर मिळाला. (प्रतिनिधी)