विट्यात यंत्रमागावर पंधरा टक्के बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:02 PM2017-10-17T15:02:24+5:302017-10-17T15:09:42+5:30
विटा येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार कामगारांना बोनसरूपाने दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार असल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे.
विटा , दि. १७ : येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार यंत्रमाग कामगारांना बोनसरूपाने दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वाटप होणार असल्याने कामगारांत समाधानाचे वातावरण आहे.
विटा शहरातील सुमारे सहा हजारांहून अधिक यंत्रमागावर दोन हजार कामगार काम करीत आहेत. त्यांचा दिवाळी सण गोड व्हावा, यासाठी बोनस देण्याचा निर्णय घेण्यासाठी विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली.
बैठकीत अनेक यंत्रमागधारकांनी सांगितले की, दसरा किंवा दिवाळी जवळ आली की बोनससाठी कामगारांचा संप, मोर्चे, कामबंद आंदोलन असे प्रकार घडत आहेत. परंतु, विटा शहरातील यंत्रमागधारक गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न एक विचाराने संपवित आहेत. त्यामुळे कामगारांना बोनस देण्यासाठी एकमताने निर्णय घ्यावा. त्यानंतर कामगारांना दोन महिन्याच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यामुळे यंत्रमाग कामगारांना सुमारे दोन कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याने कामगारांची दिवाळी चमचमीत होणार आहे.
या बैठकीस दत्तोपंत चोथे, सुरेश म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शशिकांत तारळेकर, मधुकर म्हेत्रे, शिवाजी कलढोणे, विनोद तावरे, अनिल चोथे, राम तारळेकर, नितीन तारळेकर, कन्हैया शेंडे, मदन तारळेकर, धनंजय चोथे, सचिन रसाळ, राजन चौगुले, मिलिंद चोथे उपस्थित होते.
संघर्षाला फाटा : एकमताने निर्णय
विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर म्हणाले, विटा यंत्रमाग संघाच्या माध्यमातून शहरातील औद्योगिक शांतता टिकून राहण्यासाठी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नामुळे कामगार व यंत्रमाग उद्योजक यांच्यात परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही संघर्षाशिवाय या ठिकाणी कामगार पगार, बोनस यासारखे निर्णय एकमताने घेतले जातात. कामगार व मालक यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाºयांना बोनस देण्याचे शासनाने बंद केले असतानाही विट्यातील यंत्रमागधारक कामगारांची दिवाळी चमचमीत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.