सांगली ते पाचवा मैल रस्ता महामार्गाला जोडावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:17+5:302021-01-09T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कऱ्हाड ते तासगाव या राष्ट्रीय महामार्गातून पाचवा मैल ते सांगली हा रस्ता वगळला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कऱ्हाड ते तासगाव या राष्ट्रीय महामार्गातून पाचवा मैल ते सांगली हा रस्ता वगळला आहे. त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून केंद्र शासनाकडून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच सांगली-पेठ रस्त्याच्या आखणीत बदल करण्याची विनंतीही त्यांनी केली.
मुंबईत केंद्रीय मंत्री गडकरी यांची आ. गाडगीळ, आ. सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजप प्रदेश सदस्य शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गाडगीळ यांनी जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गाबाबत गडकरी यांना माहिती दिली.
सध्या कऱ्हाड ते तासगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पाचवा मैल ते सांगली हा रस्ता त्यातून वगळला आहे. या रस्त्याचा समावेश केल्यास सांगली शहर या राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाईल. पेठनाका-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या सध्याच्या आखणीमधील आयर्विन पूल ते पुष्पराज चौक ते विश्रामबाग, मिरज ही १२ किमीची लांबी पूर्णतः सांगली व मिरज या दोन्ही शहरांच्या मुख्य बाजारपेठेतून जाते. यामुळे सांगली व मिरज शहराच्या दृष्टीने प्रचंड गैरसोयीचे होणार आहे. तरी ही आखणी बदलून त्याऐवजी सांगलीवाडी टोल नाका ते जुना बायपास ते कॉलेज कॉर्नर ते कुपवाड ते कुपवाड एमआयडीसीमार्गे तानंग फाटा ते राष्ट्रीय महामार्ग अशी करावी, असेही आ. सुधीर गाडगीळ यांनी सुचविले. मंत्री गडकरी यांनी सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
चौकट
महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय सांगलीत व्हावे
राष्ट्रीय महामार्गाची कामे वेळेत होणे, प्रशासकीय कामे सुरळीत होण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर यांचे अधिपत्याखालील उपविभागीय कार्यालय सांगली येथे स्थलांतरित करण्याची गरज आहे. जिल्ह्यात होणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय सांगली येथे होण्याबाबतची मागणी आ. गाडगीळ यांनी केली.