पन्नास टक्के उपस्थितीच्या सक्तीने शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:16+5:302021-04-16T04:27:16+5:30
सांगली : राज्यात ३० एप्रिलपर्यंत शंभर टक्के शाळा बंदचे आदेश असताना सांगली जिल्ह्यात मात्र ५० टक्के शिक्षकांची शाळेत उपस्थिती ...
सांगली : राज्यात ३० एप्रिलपर्यंत शंभर टक्के शाळा बंदचे आदेश असताना सांगली जिल्ह्यात मात्र ५० टक्के शिक्षकांची शाळेत उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेने याला तीव्र विरोध केला असून शिक्षकांना कोरोनाच्या दाढेत देऊ नका, असे आवाहन केले आहे.
परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सर्वच शाळा ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद ठेवल्या जाणार आहेत. नजिकच्या सातारा, रत्नागिरीसह काही जिल्ह्यांतही शाळा व शिक्षकांना पूर्ण सुटी दिली आहे. सांगली जिल्ह्यात मात्र पन्नास टक्के शिक्षकांना शाळेत हजर राहण्यास सांगितले आहे. परीक्षेच्या निकालाची तयारी किंवा शाळेची दैनंदिन प्रशासकीय कामांच्या नावाखाली शिक्षकांना शाळेत येण्याचे फर्मान आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन अधिकारीच करत आहेत. शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
नागरगोजे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शाळा बंद राहतील, असा स्पष्ट आदेश दिला आहॆ, त्याचे काटेकोर पालन करायला हवे. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत जाऊ नये. इतर कर्मचाऱ्यांनाही बोलावू नये. कोरोनाच्या उग्र लाटेत स्वत:सह कर्मचार्यांनाही सुरक्षित ठेवावे. विद्यार्थ्यांनाही कोणत्याही कारणास्तव शाळेत बोलावू नये.
चौकट
ऑनलाईन अभ्यास सुरुच राहणार
दरम्यान, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन असले तरी दैनंदिन कामांसाठी ५० टक्के शिक्षकांनी शाळेत यायचे आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरुच ठेवायचे आहे. या कालावधीत कोणीही मुख्यालय सोडायचे नाही. दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्त शिक्षकांनी लसीकरण करून घ्यायचे आहे, अन्यथा त्यांच्याकडे ४८ तासांपूर्वीचे कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असायला हवे.