जनतेचा लढा चोरांशी : शहनाझ हिंदुस्तानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:11 AM2018-05-14T00:11:28+5:302018-05-14T00:11:28+5:30
मिरज : देशातील नागरिकांची लढाई आधी गोऱ्यांसोबत होती; पण ती आता महापालिकेतील भ्रष्टाचारी चोरांसोबत आहे. मिरज येथील स्थानिक समस्यांवर आज महापालिका स्थापन होऊन वीस वर्षे उलटूनही उपाय केला गेला नसून, हा स्थानिक लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणाच असल्याची टीका आम आदमी पार्टीचे प्रचारक शहनाझ हिंदुस्तानी यांनी केली.
महापालिका निवडणुकीसाठी मिरजेतील किसान चौकात प्रचार सभा पार पडली. आम आदमी पार्टी व सांगली जिल्हा सुधार समिती यांची महापालिका निवडणुकीसाठी आघाडी आहे. दोन्ही पक्षांच्या संयुक्त सभेत शहनाझ हिंदुस्तानी यांनी कविता, शेर व गाण्यांच्या माध्यमातून महापालिकेतील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली.
जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांनीदेखील मिरजेतील भ्रष्टाचार व मिरज पॅटर्न मोडीत काढण्यासाठी व शहराच्या विकासासाठी साथ देण्याचे आवाहन केले. आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक डॉ. अमोल पवार, ‘आप’चे प्रचारप्रमुख संदीप देसाई, शेतकरी संघटनेचे महेश खराडे, सुधार समितीचे तानाजी रुईकर, नितीन मोरे, रवींद्र ढोबळे, अष्पाक मोमीन, गंगाराम सातपुते, वसीम मुल्ला यांची भाषणे झाली. यावेळी अॅड. अरुणा शिंदे, शुभांगी रुईकर, तेजश्री अवघडे, मारुती पवार, प्रीती गुर्जर, अजिंक्य शिंदे, संतोष शिंदे उपस्थित होते.