वाघासारखे लढा, पुढच्याचा घाम हा बाळासाहेब काढेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:30+5:302021-09-07T04:32:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा कार्यकर्ता वाघासारखा लढणारा हवा. लढताना जिंकू किंवा पडू, याची चिंता करू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा कार्यकर्ता वाघासारखा लढणारा हवा. लढताना जिंकू किंवा पडू, याची चिंता करू नका. फक्त हिमतीने आणि ताकदीने लढा. पुढच्याचा घाम काढण्याचे काम हा बाळासाहेब करेल, अशा शब्दात कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ दिले.
येथील तालुका आणि शहर काँग्रेसच्या कार्यालयात कदम यांनी इस्लामपूर, आष्टा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे उपस्थित होते.
कदम म्हणाले की, लढायचे असेल तर हिमतीने आणि ताकदीने लढा. यश तुमच्या कर्तृत्वावर मिळेल. आम्हाला डिपॉझिट जप्त होणारे कार्यकर्ते नकोत. इस्लामपूर पालिकेसह वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यश मिळवणारे उमेदवार देऊन इतिहास घडवा. तुम्हाला लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे.
राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, आर. आर. पाटील, प्रा. हेमंत कुरळे, विजय पवार, संदीप जाधव, अकीब जमादार, सुरेश पाटील, जयदीप पाटील उपस्थित होते.
चौकट
शहराध्यक्षांकडून डिपॉझिट घेईन
विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे बळ देतानाच जर एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट गेले, तर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्याकडे रोख धरत, ‘सरकार, हे डिपॉझिट तुमच्याकडून घेईन’, असा टोला मारताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.