सर्कल आणि तलाठी यांच्यात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:16+5:302020-12-24T04:24:16+5:30
इस्लामपूर : उरुण परिसरातील चावडीमध्ये असणारे सर्कल आणि तलाठी यांच्यात वाद उफाळला आहे. या दोघांमध्ये रोजच वादावादी सुरू ...
इस्लामपूर : उरुण परिसरातील चावडीमध्ये असणारे सर्कल आणि तलाठी यांच्यात वाद उफाळला आहे. या दोघांमध्ये रोजच वादावादी सुरू असते. एकेदिवशी तर चक्क दोघे एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. याची तक्रारही सामाजिक कार्यकर्ते अंगराज पाटील यांनी आणि अंकुश जाधव यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली. तरीसुद्धा या चावडीत या दोघांमध्ये नेहमीच वादावादी होत असल्याने शासकीय कामावर याचा मोठा परिणाम झाला आहे.
या दोघांच्या वादामुळे बहुतांश दिवस हे तलाठी महाशय कार्यालयाकडे फिरकतसुद्धा नाहीत. सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी असाच प्रकार घडला. बरेच शेतकरी आपले शासकीय उतारे आणण्यासाठी तलाठी कार्यालयात तलाठी महाशयांची वाट बघत थांबले होते. याबाबत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी पाटील यांनी, त्यांचा वाद मिटवला आहे, ते कार्यालयात येतील. परंतु हे तलाठी महाशय त्यादिवशी फिरकलेच नाहीत. तलाठी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला तरी ते फोन घेत नव्हते. अशा घटना वारंवार घडत आहेत. या दोघांच्या वादामुळे त्यांच्या हाताखाली काम करणारे झिरो कर्मचारीही निघून जातात. त्यामुळे सात-बारा नोंदी आदी कागदपत्रे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे घालावे लागतात, तर काही शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी दिसत नाहीत. याचे कारण विचारले असता, मागच्या तलाठ्यांनी केलेल्या त्या चुका आहेत, त्यांना विचारा, असे उद्धट उत्तर दिले जाते. तरी लोकप्रतिनिधी या नात्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीच याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.