सांगलीत ‘इंटरनेट कंपन्या वॉर’ भडकले, तिघांवर कोयत्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:47 PM2022-03-01T12:47:28+5:302022-03-01T12:48:06+5:30
कंपन्यांमध्ये ग्राहक मिळविण्यावरून व ग्राहकांना अधिक गतीने इंटरनेट पुरविण्यावरून स्पर्धा रंगली आहे
सांगली : शहरात ‘केबल वॉर’ आता शांत झाले असतानाच, आता ‘इंटरनेट कनेक्शन कंपन्यांचे वॉर’ भडकू लागले आहे. शहरातील काँग्रेस भवन ते शिवाजी क्रीडांगण मार्गावर एका खासगी इंटरनेट कंपनीची वायर मध्यरात्रीच्या सुमारास तोडणाऱ्या तरुणांना रोखण्यावरून दोन गटांत जोरदार वादावादी झाली. यातून आठजणांनी तिघांना बेदम मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
याप्रकरणी शुभम चंद्रकांत खरमाटे (वय २६, रा. वंजारवाडी, ता. तासगाव) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरमाटे याच्या फिर्यादीवरून वैजनाथ बोराडे, आशा साळुंखे, विशाल ननवरे, नीतेश मदने यांच्यासह अन्य अशा आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शुभम खरमाटे यांची इंटरनेट सुविधा पुरविणारी प्राईम नेटवर्क इंटरनेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, ते बाळासाहेब पवार यांच्यासोबत काम करतात. काँग्रेस भवन परिसर ते कॉलेज कॉर्नर परिसरात या कंपनीद्वारे सेवा दिली जाते. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांची इंटरनेट सुविधा अचानक बंद पडली. काहीही कारण नसताना इंटरनेट सेवा बंद झाल्याने खरमाटे यांना संशय आला. त्यामुळे ते सहकारी पवार आणि कर्मचारी शुभम सूर्यवंशी यांना घेऊन केबल मार्गावर तपासणीस बाहेर पडले.
त्यांना लिंगायत बोर्डिंग जवळील एका खांबावर काही तरुण शिडी लावून वायर तोडताना दिसले. त्यांनी धावत जात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग केला असता, त्यांनी तिघांनाही दगड फिरकावून मारले व त्यानंतर सर्व संशयित दुचाकीवरून पळून जाऊ लागले. त्यानंतर त्या आठ तरुणांनी खरमाटे, पवार आणि सूर्यवंशी या तिघांनाही बेदम मारहाण करीत कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सर्व संशयितांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धा वाढली
शहरात विविध दहा ते बारा खासगी कंपन्यांकडून आता इंटरनेटची सुविधा देण्यात येत आहे. विविध दूरसंचार कंपन्यांनी शहरभर केलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचा यासाठी उपयोग होतो. कंपन्यांमध्ये ग्राहक मिळविण्यावरून व ग्राहकांना अधिक गतीने इंटरनेट पुरविण्यावरून स्पर्धा रंगली आहे. यातूनच एकमेकांच्या केबल तोडण्याचेही प्रकार घडत आहेत.