प्लॉट विक्री व्यवहारातून मांगरुळला सख्ख्या भावांची मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:47+5:302021-07-21T04:18:47+5:30
कोकरुड : मुंबई येथे असलेल्या प्लॉट विक्रीच्या कारणावरून मांगरुळ (ता. शिराळा) येथील दोन सख्ख्या भावांमध्ये मारामारी झाली. याबाबतची फिर्याद ...
कोकरुड : मुंबई येथे असलेल्या प्लॉट विक्रीच्या कारणावरून मांगरुळ (ता. शिराळा) येथील दोन सख्ख्या भावांमध्ये मारामारी झाली. याबाबतची फिर्याद अभिजित तानाजी खांडेकर (वय ३२) यांनी कोकरुड पोलिसात दिली आहे.
रविवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी अभिजित आणि त्याचा भाऊ रणजित तानाजी खांडेकर व आई (सर्व रा. मांगरुळ) असे सर्वजण राहत्या घरी एकत्र बसले असताना, रणजित याने आईकडे ‘मला नवीन व्यवसायासाठी पैशाची गरज असून परेल (मुंबई) येथील प्लॉट विकून पैसे दे’ अशी मागणी केली. त्यावेळी अभिजित याने ‘प्लॉट विकल्यास आपले नुकसान होईल, आईला मी प्लॉट विकू देणार नाही. तू दुसरा काही तरी पर्याय बघ’ असे सांगितले. याचा राग आल्याने रणजितने अभिजितला लाथा-बुक्क्यांसह मारहाण करीत शिवीगाळ करून खाली पाडले व जवळच असलेले कळकाचे दांडके घेऊन मारहाण केली. अभिजित याच्या डोक्यास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची तक्रार अभिजित याने कोकरुड पोलिसात दिली असून रणजित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.