कवलापुरात दोन गटांत मारामारी
By Admin | Published: August 22, 2016 12:02 AM2016-08-22T00:02:28+5:302016-08-22T00:02:28+5:30
नऊ जखमी : घरात घुसून महिलांना चोपले; गुन्हा दाखल केल्याने वाद
सांगली : विनयभंगाची तक्रार दाखल केल्याच्या कारणावरून गेल्या तीन महिन्यांपासून कवलापूर (ता. मिरज) येथील मोहिते गटात सुरू असलेला वाद रविवारी दुपारी उफाळून आला. जिल्हा परिषदेच्या शाळा क्र. २ जवळ या दोन्ही गटांत जोरदार मारामारी झाली. एकमेकांचा थरारक पाठलाग करून मारहाण करण्यात आली. महिलांना तर घरातून ओढून लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये चार महिलांसह नऊजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद नव्हता.
जखमींमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित विजय शेखर मोहिते (वय २२) व त्याच्या गटातील छाया मुरलीधर मोहिते (४५), मनोज दिनकर मोहिते (२१), आशा शेखर मोहिते (३८), चंद्रकांत शेखर मोहिते (२०), तर पीडित महिलेच्या गटातील विशाल शिवलिंग मोहिते (३५), नंदा दिनकर मोहिते (४०, सर्व रा. कवलापूर) व नातेवाईक म्हणून आलेल्या कांचन कोंडिबा तांदळे (४५, मिरज), रत्ना प्रकाश आवळे (५०, म्हैसाळ, ता. मिरज) यांचा समावेश आहे. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाकडी बांबू व दगडाने मारहाण केल्याने यातील चौघांचा हात मोडला आहे. तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस कवलापुरात तसेच रुग्णालयात दाखल झाले होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील व माधवनगरचे माजी पोलिस पाटील बबन आवळे यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली.
मार्च महिन्यात संशयित विजय मोहिते याने महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी विजयविरुद्ध गुन्हा नोंद होता. त्याला अटकही झाली होती. तेव्हापासून त्यांच्या गटात वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी पीडित महिलेचा गट व संशयित विजय मोहिते गटातील लहान मुलांत किरकोळ भांडण झाले होते. त्याचे पर्यवसान मोठ्यांमध्ये मारामारीत झाले होते. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत आला होता; पण तिथे दोन्ही गटांनी ‘तक्रार देणार नाही; आम्ही आपापसात मिटवतो’, असे सांगितले. हा वाद मिटविण्यासाठी रविवारी सकाळी गावात बैठक ठेवली होती. मात्र, ही बैठक झाली नाही. त्यानंतर दुपारी तीन वाजता बैठक घेण्याचे ठरले. दोन्ही गट जमले. यावेळी वाद मिटविण्याऐवजी त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. लाकडी बांबू व दगडाने एकमेकांना पाठलाग करून चोपले. महिलांना तर घरातून ओढून मारहाण केली.
या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. महिला आरडाओरड करीत पळत होत्या. रस्त्यावरील नागरिकांचीही पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस दाखल झाले. त्यानंतर दोन्ही गटाने पांगापांग केली. तरीही पोलिसांनी धरपकड केली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. (प्रतिनिधी)
‘सिव्हिल’मध्येही मारामारी
दोन्ही गटांतील जखमी व त्यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. आकस्मिक दुर्घटना विभागात दोन्ही गटाने एकाचवेळी गर्दी केली. तिथेही ते एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहत होते. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा मारामारी सुरू झाली. रुग्णालयातील पोलिसांनी मध्यस्थी करून मारामारी सोडविली. त्यानंतर दोन्ही गटास स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विभागात ठेवून उपचार सुरू केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस जखमींचे जबाब घेण्याचे काम करीत होते; पण गुन्हा दाखल झालेला नव्हता.