पोलिसांच्या दोन गटांत मारामारी

By admin | Published: January 18, 2017 12:07 AM2017-01-18T00:07:59+5:302017-01-18T00:07:59+5:30

अंकली, उदगावमध्ये घडले थरारनाट्य

Fights in two groups of police | पोलिसांच्या दोन गटांत मारामारी

पोलिसांच्या दोन गटांत मारामारी

Next



सांगली/जयसिंगपूर : चार महिन्यांपूर्वी मोटार पेटविल्याच्या संशयावरून सांगली शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस शिपाई संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांच्या गटात अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) येथे जोरदार मारामारी झाली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. तलवार, चाकू, काठ्यांचा वापर यावेळी करण्यात आला. यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत.
दोन्ही गटांनी परस्पराविरुद्ध फिर्याद दिल्याने १५ जणांविरुद्ध सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी आठजणांना अटक केली आहे.
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई संतोष पाटील गटाचा अरुण आनंदराव हातळगे (वय २५, रा. ऐंशी फुटी रस्ता, विश्रामबाग) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीप्रमाणे पोलिस शिपाई किरण पुजारी याच्यासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात किरण राजाराम पुजारी (२८), त्याचे वडील राजाराम बाळू पुुजारी (५३), सुरेश ऊर्फ दादू सोमनाथ बंडगर (२६, तिघे रा. उदगाव, ता. शिरोळ), रोहित सतीश पाटील (१९, उत्तर शिवाजीनगर, सांगली), ओंकार पोपटराव मगदूम (१९, गावभाग, सांगली), ओंकार दिलीप माने (२३, पटवर्धन हायस्कूलजवळ, सांगली), दोन अल्पवयीनांचा समावेश आहे.
तसेच हातळगे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस शिपाई किरण पुजारी याची मोटार चार महिन्यांपूर्वी पेटविली होती. मोटार पेटविण्यामागे पोलिस संतोष पाटील याचाच हात असल्याचा पुजारीला संशय होता. तेव्हापासून या दोघांत वाद सुरू आहे. दोघेही एकाच पोलिस ठाण्यात नेमणुकीस असूनही, त्यांच्यातील खुन्नस वाढतच गेली. हातळगे व त्याचा मित्र दत्तात्रय झांबरे हे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता कामानिमित्त अंकली फाट्यावर गेले होते. त्यावेळी किरण पुजारी, त्याचे वडील राजाराम पुजारी यांच्यासह नऊ संशयितांनी त्यांना गाठले. पुजारी याने हातळगेला, ‘संतोष पाटील तुझा मित्र आहे. माझी मोटार त्यानेच पेटविली आहे’, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद सुरु झाला. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी हातळगेवर तलवारहल्ला केला, तर झांबरेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी या दोघांना मोटारीतून उदगावला नेऊन तिथेही बेदम मारहाण केली. यामध्ये हातळगे व पुजारी जखमी झाले. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दुसऱ्या गटाचे पोलिस किरण पुजारी याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस संतोष पाटील, सचिन डोंगरे, अरुण हातळगे, दत्तात्रय झांबरे, स्वप्नील कोलप, महेश नाईक व चार ते पाच अनोळखी अशा सहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुजारीने फिर्यादीत म्हटले आहे की, त्याची मोटार चार महिन्यांपूर्वी पेटविली होती. याबद्दल त्याने किरण पाटील, अरुण हातळगेसह चौघांवर संशय घेतला होता. यातून त्याचा पाटीलशी वादही झाला होता. सोमवारी रात्री पुजारी हा कुटुंबासमवेत घरी होता. त्यावेळी त्याच्या घराबाहेर असलेल्या मोटारीवर हातळगे व त्याच्या मित्राने बियरच्या बाटल्या फेकून मारल्या. याच्या आवाजाने पुजारी बाहेर गेला. त्याने पाठलाग करुन हातळगेला पकडले. मोटारीवर बाटल्या का फेकून मारल्यास, असा त्याला जाब विचारल्यानंतर त्याने किरण पाटीलच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे सांगितले. तेवढ्यात संतोष पाटील व सचिन डोंगरे तिथे येऊन लगेच निघून गेले.
पुजारीने त्याचे मित्र सुहास बंडगर, रोहित पाटील यांना सोबत घेऊन संतोष पाटीलचा अंकलीपर्यंत पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत. त्यामुळे पुजारी मित्रासोबत उदगावला येत होता. जोग फार्महाऊसजवळ संतोष पाटील, सचिन डोंगरे, स्वप्नील ऊर्फ गोट्या कोलप, महेश नाईक व चार ते पाच अनोळखी संशयितांनी पुजारीला गाठले. त्याच्यावर चाकू व काठीने हल्ला केला. यामध्ये पुजारीसह त्याचे वडील, भाऊ सागर, सुहास बंडगर हे चौघे जखमी झाले. (प्रतिनिधी)

गंभीर गुन्हे दाखल
पाटील व पुजारी यांच्या दोन्ही गटाविरुद्ध सांगली ग्रामीण व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, जिवे मारण्याच्या उद्देशाने पळवून नेणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पाटील गटाकडील चौघांना रात्री उशिरा जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. ग्रामीण पोलिसांनी पुजारी गटाच्या नऊजणांना अटक केली आहे. या सर्वांना बुधवारी सांगली व जयसिंगपूरच्या न्यायालयात उभे केले जाणार आहे.

Web Title: Fights in two groups of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.