'चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यमवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:12 PM2022-02-24T19:12:41+5:302022-02-24T19:14:10+5:30
शेअर बाजारासारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च व्यक्तीने अध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने कामकाज करणे ही शरमेची बाब
सांगली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सहकारी आनंद सुब्रमण्यम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. चित्रा यांनी सेबीला दिलेला जबाब गृहीत धरून दोघांना तातडीने अटक करण्याची मागणीही केली आहे.
तसे निवेदन अंनिसने सीबीआय व मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शेअर बाजारासारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेमधील सर्वोच्च व्यक्तीने अध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने कामकाज करणे ही शरमेची बाब आहे. गुन्हादेखील आहे. को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा यांनी तसा जबाबही दिला आहे. आनंद सुब्रम्हण्यम यांची नियुक्ती आणि इतर बाबींमध्ये हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत असल्याचे नमूद केले आहे. गुरूचा ठावठिकाणा विचारला असता त्यांना मानवी देह नाही असे अतिंद्रीय शक्तींचा दावा करणारे उत्तर दिले आहे.
प्रत्यक्षात शरीराशिवाय मानवी अस्तित्व शक्य नाही, या स्थितीत लोकांच्या मनातील धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊन दोघांनी लोकांची फसवणूक केली आहे. तथाकथित बाबाकडून आलेल्या इमेलदेखील सीबीआयच्या चौकशीत सापडल्या आहेत. सेबीने केवळ आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेचा तपास करताना भोंदूगिरीच्या दाव्यांकडे दुर्लक्ष केले आहे, पण भोंदुगिरीचाही तपास करायला हवा.
पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तीने महत्वाचे कार्यालयीन निर्णय भोंदू बाबाच्या सल्ल्याने घेणे ही फसवणूक आहे. लोकांच्या धर्मभावनांचा फायदा उठविण्यासाठी एखाद्या बाबाच्या नावाआड कृष्णकृत्य झाकण्याचा प्रयत्न करणे हीदेखील जनतेची फसवणूक आहे. हे लोकांसमोर येण्यासाठी अंनिस पाठपुरावा करणार आहे. सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन मोहीम राबवणार आहे.