जयंत पाटलांना 'लालपरी' चालवण्याचा मोह अंगलट येणार?; भाजपने गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:22 PM2022-08-17T16:22:33+5:302022-08-17T16:24:09+5:30
जयंत पाटलांनी या लालपरीचे स्टेअरिंग हाती घेत शहरातून फेरफटका मारला होता.
इस्लामपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सजवण्यात आलेली एसटी बस चालवण्याचा मोह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आवरता आला नाही. अन् जयंत पाटलांनी या लालपरीचे स्टेअरिंग हाती घेत शहरातून फेरफटका देखील मारला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र जयंत पाटलांना लालपरी चालवण्याचा हा मोह आता अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी जयंत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एस.टी. महामंडळाकडे नियुक्ती नाही. एस.टी.सारखे अवजड वाहन चालविण्याचा बॅच-बिल्ला नसताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सार्वजनिक वापराचे वाहन चालवून पादचारींना व इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत वाहन चालविले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना याबाबतचे निवेदन दिले.
सोमवार (दि.१५ ऑगस्ट) रोजी स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव संपुर्ण देशभर मोठया उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत इस्लामपुर आगारातील विठाई बस क्र. एम.एच. १३ सी.यु. ८१२२ सजविण्यात आली होती. जयंत पाटील यांनी यांच्याकडे आवश्यक असणारा आर.टी.ओ. चा बॅच बिल्ला नसताना, जड वाहन चालक म्हणुन आवश्यक असणारी अनुज्ञाप्ती नसताना ही बस चालवून शहरातून फेरफटका मारला. त्यांच्या एका चुकीमुळे मोठी दुर्घटना घडुन पादचारीच्या जिवीतास धोका निर्माण होवुन वाहनांचे नुकसान झाले असते. यामुळे जयंत पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी अंती इतर योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, भाजपा युवा मोर्चा इस्लामपुर अध्यक्ष सतेज पाटील, सांगली जिल्हा भाजपा चिटणीस संजय हवलदार, भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस प्रविण परीट, रामभाऊ शेवाळे,आबा मोरे, आदिसह अन्य मान्यवर व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.