निकृष्ट रस्त्याची बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:11+5:302021-01-08T05:25:11+5:30
मिरज पंचायत समितीची मासिक सभा प्रभारी सभापती दिलीपकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर, कक्ष अधिकारी ...
मिरज पंचायत समितीची मासिक सभा प्रभारी सभापती दिलीपकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर, कक्ष अधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. टाकळी- सलगरे या १८ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे निकृष्ट कामाचे व साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण असल्याने संबंधित ठेकेदारास बिले अदा करू नयेत, असा ठराव पंचायत समितीने केला होता. मात्र, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास बिले अदा केली. ठरावाचे उल्लंघन करुन बिले देणाऱ्या बांधकाम अधिकाऱ्यांचा सभागृहात निषेध करण्यांत आला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिल आमटवणे यांनी केली.
रस्ते देखभाल, दुरुस्ती निधी प्रत्येक वर्षी पन्नास टक्के खर्च करण्याचे आदेश असताना तो ९ दिवसांत घाईगडबडीने सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी खर्च केल्याचा आरोप अशोक मोहिते यांनी केला. शौचालय सुशोभीकरण घोटाळ्यातील दोषीवर कारवाईची मागणी कृष्णदेव कांबळे यांनी केली. महिला सबलीकरण योजना प्रभावीपणे राबविण्याची विक्रम पाटील यांनी केली. सभेत काकासाहेब धामणे, किरण बंडगर, सतीश कोरे यांनीही प्रश्न उपस्थित केले.
चौकट
आरग पाणी योजनेच्या ठेकेदारास दंड
आरग पाणी योजना सब ठेकेदारामुळे रखडल्याने मुख्य ठेकेदारावर कोणती कारवाई केली, अशी विचारणा अनिल आमटवणे यांनी केली. यावर मुख्य ठेकेदारास प्रत्येक दिवसाला २३ हजार ८०० रुपयांचा दंड आकारल्याचे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एम. टी. मठपती यांनी सांगितले.
चौकट
...तर कार्यालयासमोर ठिय्या
बेडग रस्त्यावरील कत्तलखाना, कचरा डेपो, समडोळी रस्त्यावरील कचरा डेपोच्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. याबाबत कारवाई न केल्यास महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारण्याचा इशारा अनिल आमटवणे, अशोक मोहिते व किरण बंडगर यांनी दिला.