क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:12 PM2019-06-03T14:12:38+5:302019-06-03T14:13:26+5:30
हरिपूर रस्त्यावरील काळी वाट येथे भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीवरील ऋचा सुशांत धेंडे (वय ४) ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : हरिपूर रस्त्यावरील काळी वाट येथे भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात दुचाकीवरील ऋचा सुशांत धेंडे (वय ४) ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर संतप्त जमावाने ट्रकच्या क्लिनरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. क्लिनरच्या मृत्यूप्रकरणी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पण ट्रकचालक अद्याप फरार आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
हरिपूर रस्त्यावर संदीप कृष्णा धेंडे (४३) हे पुतणी ऋचा सुशांत धेंडे (४) व मामाची मुलगी साक्षी असे तिघे निघाले होते. यावेळी भरधाव ट्रक (क्र. एमएच ०४ ईबी ०३५७) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील ऋचा रस्त्यावर आदळली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर ट्रक हरिपूर रस्त्यावरील कमानीला जाऊन धडकला. यावेळी संतप्त जमावाने ट्रकचा क्लिनर कुमार श्रीमंत आळगीकर (३०, रा. हरिपूर) याला पकडून बेदम मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकचालक फरार झाला होता. शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
रविवारी संदीप धेंडे यांनी शहर पोलिसांत ट्रकचालकाविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलिसांनी चालकावर दाखल केला आहे. या ट्रकचा चालक प्रदीप माने असल्याचे रविवारी तपासात निष्पन्न झाले आहे. पण अद्याप तो फरार आहे.
मृत आळगीकर यांचा भाऊ मल्लाप्पा आळगीकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात ट्रक व मोटारसायकलच्या धडकेत चिमुरडी मृत झाल्याने जमावाने ट्रकचालक समजून कुमार आळगीकर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याचे म्हटले आहे.
शहर पोलिसांनी जमावावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. पण रात्री अंधार असल्याने फुटेजमधील दृश्ये स्पष्टपणे दिसत नाहीत.
जमावातील सहा जणांना पोलिसांनी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. संशयितांची नावे स्पष्ट झाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले.