जिल्हा बॅँकेत ३0 हजार रुपे कार्ड दाखल
By admin | Published: December 11, 2015 12:08 AM2015-12-11T00:08:09+5:302015-12-11T00:48:31+5:30
२९ डिसेंबरला वितरण : सर्व चाचण्या झाल्या यशस्वी
सांगली : अन्य बँक ग्राहकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममधून व्यवहार करण्याची चाचणीही यशस्वी झाल्याने, नव्या वर्षापासून जिल्हा बँकेच्या रुपे कार्डची योजना सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३0 हजार रुपे कार्डे बँकेत दाखल झाली आहेत. येत्या २९ डिसेंबर रोजी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
दिलीपतात्या म्हणाले की, २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता बँकेच्या सभागृहात रुपे डेबिट कार्डच्या वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे आमच्या ग्राहकांसाठीही आता ‘रूपे कार्ड’ देण्याची योजना आखली आहे.
एनपीसीआयने देशभरातील सर्वच मान्यताप्राप्त बॅँकांच्या एटीएम व्यवहाराचे दरवाजे सांगली जिल्हा बॅँकेसाठी खुले केले आहेत. ज्याप्रमाणे जिल्हा बँकेचे कार्ड अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालते, तसेच अन्य बँकेच्या ग्राहकांनाही जिल्हा बँकेच्या एटीएमचा वापर करता येणार आहे. त्याचीही चाचणी घेण्यात आली. ही शेवटची चाचणीही यशस्वी झाल्याने आता रुपे कार्डचा प्रयोग खऱ्याअर्थाने सफल झाला आहे.
एकूण ३० हजार रूपे कार्ड बँकेत दाखल झाली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० हजार इन्स्टा कार्डचे वितरण केले जाणार आहे. ग्राहकाने खाते उघडल्यानंतर लगेचच त्याला हे इन्स्टा कार्ड दिले जाणार आहे. यावर खातेदाराच्या नावाचा उल्लेख नसला तरी, खातेदाराच्या विनंतीवरून त्याचा अर्ज जमा झाल्यानंतर कार्डावर त्याचे नाव व क्रमांक नोंदला जाणार आहे.
यापूर्वीच्या बॅँकेच्या एटीएम धारकांनाही प्राधान्याने रूपे कार्ड देण्याचा विचार बॅँक करीत आहे. उर्वरित १0 हजार कार्डे बँक ग्राहकांकडून अर्ज भरून घेऊन दिली जातील. ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)
ग्राहकांच्या अपेक्षांप्रमाणे निर्णयाची पूर्तता
ग्राहकांच्या अपेक्षा, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केलेल्या संपर्क अभियानातून ग्राहकांच्या अपेक्षा समजू शकल्या. अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये अनेक ग्राहकांनी अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालणारे रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची मागणीही केली होती. त्यानुसार बॅँकेने हे पाऊल टाकले आहे, असे पाटील यांनी सांगितले.