‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:17 AM2017-07-20T00:17:03+5:302017-07-20T00:17:03+5:30

‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

Filing of aspirants for 'District Planning' | ‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

‘जिल्हा नियोजन’साठी इच्छुकांची फिल्ंिडग

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा नियोजन समितीकडे राज्य शासनाकडून वर्षाला सुमारे २२० कोटींचा निधी मिळत असल्यामुळे समितीवर जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असून, समितीच्या २७ रिक्त जागांसाठी येत्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या मतदारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या विकास कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी येतो. राज्य शासनाकडून गेल्यावर्षी सुमारे २२० कोटींवर निधी आला आहे. आमदार, खासदारांचा फंडही जिल्हा नियोजन समितीकडेच येतो. त्यातून नगरपालिका, नगरपंचायती, महापालिका आणि जिल्हा परिषदेला विकास कामासाठी निधी दिला जातो. सर्वाधिक निधी जिल्हा परिषदेकडे दिला जात असून, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६० असली तरी, त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर सर्वाधिक सदस्य जिल्हा परिषद सदस्यांतून निवडून दिले जातात. जिल्हा नियोजन समितीत एकूण ४५ सदस्यसंख्या असून, त्यापैकी ११ स्वीकृत सदस्यांची निवड आमदार, खासदारांच्या शिफारशीने राज्य शासन करते. दोन नामनिर्देशित सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री सुभाष देशमुख असून, जिल्हाधिकारी सचिव आहेत.
जिल्ह्यात सहा नगरपालिका असून, त्यांचे १३४ मतदार आहेत. या गटातून तीन सदस्य निवडून दिले जाणार आहे. चार नगरपंचायती असून, त्यांचे ६८ मतदार आहेत. या गटातून केवळ एकच सदस्य निवडून दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेत मतदारांची संख्या ६० असून, तेथून २३ सदस्य निवडून दिले जातील.
जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लावण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजपच्या नेत्यांनी ज्या सदस्यांना पदे दिले नाहीत, त्यांना जिल्हा नियोजन समितीवर निवडून देण्याचे धोरण ठरविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या सदस्यांनाही प्रतिनिधीत्व द्यावे लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. सदस्य निवडताना भाजपमधील नेत्यांचे मनोमीलन होणार, की नाराजीनाट्य आणखी रंगणार, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
नगरपालिका गट तीन, नगरपंचायत एक आणि जिल्हा परिषदेतून २३ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या जागांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित जागा शासननियुक्त आहेत. एकूणच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आता राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.
संजयसिंह चव्हाण यांच्याकडे जबाबदारी
निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. निवडणुकीची सर्व जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मतदारांची यादी हरकतीसाठी सोमवार, दि. १७ रोजी प्रसिध्द केली. या हरकतींची मुदत दि. १९ रोजी संपली असून, दोन दिवसात मतदार यादी अंतिम होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होणार आहे.
मतदान : की बिनविरोध?
जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बहुतांशवेळा बिनविरोधच झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आजपर्यंत वर्चस्व होते. परंतु, यावर्षी प्रथमच भाजपने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आहे. इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही भाजपचे नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामुळे यावेळी भाजपचे वर्चस्व राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी समझोता करून भाजपने बिनविरोधचा प्रस्ताव दिला तरच, निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपच्या अंतर्गत कलहावरही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार, हे ठरणार आहे.

Web Title: Filing of aspirants for 'District Planning'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.