भाडेकरूसह गोडावून मालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:20+5:302021-01-16T04:30:20+5:30
विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावरील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे तुकाराम गायकवाड यांच्या मालकीचे गोडावून आहे. गायकवाड यांनी ...
विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावरील पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे तुकाराम गायकवाड यांच्या मालकीचे गोडावून आहे. गायकवाड यांनी हे गोडावून रामभाऊ सपकाळ यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. या गोडावूनमध्ये स्वस्त धान्य दुकानांना शासनाच्यावतीने पुरविण्यात येणारे तांदूळ व गव्हाचा साठा करण्यात आल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती.
त्यानुसार बुधवारी सायंकाळी ४ वाजता निवासी नायब तहसीलदार एस. एस. साळुंखे व पुरवठा निरीक्षक त्रिवेणी गुरव यांनी सदर गोडावूनवर छापा टाकला. त्यावेळी त्यांना प्रत्येकी ५० किलो वजनाची २२१ तांदळाची व ९८ गव्हाची पोती सापडली. शासकीय दराप्रमाणे तांदळाची किंमत २५ हजार ४१५ रुपये तर गव्हाची शासकीय किंमत ६ हजार ३७० रुपये होते.
त्यामुळे हे सर्व शासकीय धान्य प्रशासनाने जप्त केले आहे. बेकायदेशीर शासकीय धान्याचा जास्त दराने विक्री करण्यासाठी काळाबाजार केल्याप्रकरणी रामभाऊ सपकाळ तर भाडेतत्त्वावर दिलेल्या गोडावूनमध्ये बेकायदेशीर शासकीय धान्याची साठवणूक केल्याचे माहिती असूनसुद्धा धान्य ठेवण्यास गोडावून दिल्याप्रकरणी गोडावून मालक तुकाराम गायकवाड या दोघांविरुद्ध पुरवठा निरीक्षक त्रिवेणी गुरव यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पुढील तपास करत आहेत.