कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
By admin | Published: September 19, 2016 11:38 PM2016-09-19T23:38:11+5:302016-09-20T00:04:47+5:30
चंद्रकांतदादा पाटील : कवठेमहांकाळला मध्यवर्ती प्रशासकीय भवनचे उद्घाटन
कवठेमहांकाळ : सरकारने सेवा हमी विधेयक तयार केले असून, जनतेच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेला वेळेत सुविधा द्याव्यात, जेणेकरून गुन्हे दाखल करण्याची वेळच येणार नाही, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. डिसेंबरअखेर महाराट्रात दहा हजार कोटींचे रस्ते होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार संजय पाटील होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता जाधव आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने अर्धवट स्थितीतील बांधकामे पूर्ण व्हावीत व ज्या हेतूने ती उभारली आहेत, तो उद्देश सफल व्हावा, यासाठी सकारात्मक काम सुरू केले आहे. त्याचबरोबरच सर्वसामान्य जनतेला चांगल्या व वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी सेवा हमी विधेयक आणले आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित दाखले किती कालावधित द्यायचे, याबाबत माहिती दिली आहे.
सुमनताई पाटील म्हणाल्या की, आर. आर. आबांच्या प्रयत्नामुळे ही इमारत मंजूर झाली असून ती पूर्णत्वास आली आहे. यामुळे आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तालुक्यातील विविध कामांची मागणी पालकमंत्री या नात्याने आपल्याकडे केली असून, ती काम आपण लक्ष घालून पूर्ण करावीत, अशी मागणी केली.
गायकवाड यांनी, प्रशासकीय भवनातून जनतेला चांगल्या सेवा मिळतील, असा विश्वास दिला.
खा. संजय पाटील म्हणाले, मध्यवर्ती प्रशासकीय भवनातून सर्वसामान्य जनतेला चांगल्या व दर्जेदार सुविधा द्याव्यात. म्हैसाळ योजनेचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. यासाठी निधी मिळणार असून उर्वरित कामांसाठी निधी द्यावा.
यावेळी प्रा. भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजय सगरे, निवृत्त कर्नल संपतराव साळुंखे, अनिल लोंढे, मिलिंद कोरे, आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, गणपती सगरे, अनिल शिंदे, गजानन कोठावळे, दादासाहेब कोळेकर, उपसभापती जगन्नाथ कोळेकर आदी उपस्थित होते. आभार तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मानले. (वार्ताहर)
मोर्चासाठी शासकीय सुटीची मागणी
कवठेमहांकाळ येथे कार्यक्रमानिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आले असता, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांना, मंगळवारी, २७ सप्टेंबरला मराठा समाज क्रांती मोर्चाला समाजबांधवांना हजर राहता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना यादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मराठा समाज क्रांती मोर्चाच्या बांधवांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.