‘पशुवैद्यकीय’च्या रिक्त जागा भरणार
By admin | Published: September 5, 2016 12:12 AM2016-09-05T00:12:55+5:302016-09-05T00:12:55+5:30
महादेव जानकर : वेजेगावात पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपूजन
विटा : पशुुसंवर्धन व दुग्ध विकास हे पूर्वी कृषी खात्याला संलग्न असल्याने ८० टक्के निधी कृषी खातेच घेत होते. त्यामुळे पशुसंवर्धन खाते दुर्लक्षित राहिले. परंतु, मी मंत्री झाल्यानंतर फिफ्टी-फिफ्टी निधी केला. आता येत्या सहा महिन्यांत पशुसंवर्धन खात्यात सुधारणा करणार आहे. मत्स्य व्यवसायामुळे २२ हजार कोटींचा फायदा होतो आहे. त्यामुळे आता आपल्या लोकांनीही मत्स्य व्यवसायाकडे वळावे. शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धनासाठी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्यातील पशुवैद्यकीय पदाच्या रिक्त जागा तातडीने भरणार असल्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
वेजेगाव (ता. खानापूर) येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन रविवारी मंत्री जानकर यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, पशुसंवर्धन सभापती संजीव सावंत, जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर, सभापती वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर उपस्थित होते.
जानकर म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे मंत्री आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त व्हायचा नसेल, तर त्याने प्रशासकीय लढाई लढली पाहिजे. सध्या खोट्या प्रतिष्ठेत पाटीलकी वाया जाऊ लागली आहे. चांगल्या ठिकाणी येऊन लोकांनी चांगले काम केले पाहिजे.
संजय लोखंडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास सुशांत देवकर, डॉ. बालेखान शेख, अॅड. विनोद गोसावी, नगरसेवक दिलीप आमणे, रामभाऊ देवकर, विकास चव्हाण, दशरथ लोखंडे, अजित पाटील, सचिता सावंत, डॉ. विजय सावंत, दीपक माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)