कर्ज वसुलीसाठी फायनान्स एजंटांकडून फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:39 PM2022-09-26T13:39:25+5:302022-09-26T13:39:45+5:30
दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे
आटपाडी : आटपाडी ते दिघंचीदरम्यान महामार्गावर एका मालवाहतूक वाहनाचा फायनान्स कंपनीच्या एजंटांनी कर्ज वसुलीसाठी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग केला. एकेरी मार्गिकेत घुसून तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग करत बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर संबंधित वाहन पकडले. दोन्ही वाहने एकेरी मार्गिकेत घुसल्याने तब्बल तीन ठिकाणी अपघात होता होता टळला. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली.
गेल्या काही दिवसांपासून आटपाडी व दिघंची परिसरामध्ये चारचाकी व मालवाहतूक वाहनांसाठी फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या वसुली एजंटाचा सुळसुळाट झाला आहे. नियम धाब्यावर बसवून कारभार सुरू आहे. महामार्गावरच थांबून आटपाडी ते दिघंची व दिघंची ते पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाते. थकबाकी असलेले वाहन दिसताच चालकास अडवून हफ्त्याबाबत विचारणा केली जाते. मात्र, अनेकदा वाहनचालकाला या अडवणुकीचा अंदाज येत नाही. वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले जाते. अशा वेळी वसुली एजंट त्या वाहनांचा पाठलाग करतात. मात्र पाठलाग करताना महामार्गावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण केला जातो.
बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान आटपाडीहून दिघंचीमार्गे माळशिरसकडे निघालेला एक मालवाहतूक टेम्पो अडवण्याचा प्रयत्न या वसुली एजंटांनी केला. मात्र, चालकास अंदाज न आल्याने त्याने वाहन तसेच पुढे पळवले. यावेळी वसुली एजंटांनीही त्याचा पाठलाग करत आपली माेटार एकेरी मार्गिकेत घुसवली. भरधाव वेगाने फिल्मी स्टाईल तब्बल बारा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. यादरम्यान दिघंचीहून आटपाडीकडे येणाऱ्या तीन वाहनांना अपघात हाेता हाेता बचावला.
आटपाडी शहरातून सुरू झालेला हा पाठलाग दिघंचीतील पेट्रोल पंपावर थांबला. पेट्रोल पंपासमोर संबंधित एजंटांनी वाहन चालकाला थांबवून दमदाटी सुरू केली. थरारक पाठलाग व वाहनचालकास सुरू असलेली दमदाटी पाहून पेट्रोल पंपावर माेठी गर्दी झाली. संतप्त नागरिक माेटारीतून पाठलाग करणाऱ्या पाच-सहा एजंटांवरच धावून गेले. पोलिसात तक्रार करण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एजंटांनी पंपावरून मोटारीसह पळ काढला.
दिघंची परिसरात एजंटांचे ठाण
दिघंची-पंढरपूर व दिघंची-आटपाडी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी ठाण मांडले आहे. हफ्ते थकवलेल्या वाहनांना महामार्गावरच अडवले जाते. काही वेळा संबंधित वाहनाचा धोकादायक पद्धतीने पाठलाग केला जातो. यामुळे महामार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे.