कृष्णा कारखान्याचा अंतिम दर ३२०० रुपये--सुरेश भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:29 PM2017-09-28T22:29:36+5:302017-09-28T22:30:39+5:30
शिरटे : सत्तावन्न कोटी रुपयांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड, डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचे आधुनिकीकरण व सभासदांना मोफत पाच किलो साखर याचा कसलाही परिणाम ऊस दरावर होऊ न देता,
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : सत्तावन्न कोटी रुपयांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड, डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचे आधुनिकीकरण व सभासदांना मोफत पाच किलो साखर याचा कसलाही परिणाम ऊस दरावर होऊ न देता, परिसरातील कारखान्यांपेक्षा गत हंगामातील गळितास आलेल्या उसास ३२०० रुपयांचा उच्चांकी दर देत असल्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केले. याचवेळी त्यांनी आतापर्यंत २९५० रुपये अदा केले असून, सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी विनाकपात २५० रुपये प्रतिटन हप्ता खात्यावर वर्ग करणार असल्याचेही स्पष्ट केले.
रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे, जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, माणिकराव पाटील, भगवानराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व ठराव एकमताने मंजूर केले. तसेच डॉ. अतुल भोसले यांची विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
डॉ. भोसले म्हणाले, कारखान्याची बिघडलेली आर्थिक घडी सुरळीत झाली आहे. यंत्रसामग्री अत्यंत जुनी असून, त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. ७५०० टन असणारी गाळप क्षमता १० हजारावर नेण्याचा मानस असून, मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. जयवंत कृषी योजनेसारखा कार्यक्रम हाती घेऊन एकरी ऊस उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
इथेनॉल, बायोगॅससारख्या प्रकल्पात सुधारणा करण्यात येत आहेत. डिस्टिलरीचे आधुनिकीकरण पूर्ण होऊन उत्पादन सुरु होईल. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या कृषी महाविद्यालयाला पुन्हा उर्जितावस्था आली आहे. ५७ कोटी रुपयांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड केली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले म्हणाले की, जयवंतराव भोसले ३० वर्षे अध्यक्ष असताना, त्यांनी २२ वर्षे सर्वाधिक दर दिला होता. कारखाना कार्यक्षेत्रावर समाजकारणापेक्षा राजकारणच अधिक होत आहे. हे वातावरण निवळावे, यासाठी गणपती मंदिराशेजारी वारकरी भवन बांधावे, जेणे करुन तेथे वारकरी विचारांची देवाण-घेवाण होईल.
उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी नोटीस वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सचिव मुकेश पवार, संचालक संजय पाटील, दयाराम पाटील, जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, सुजित मोरे, ब्रीजराज मोहिते, गिरीश पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग होनमाने, एम. के. कापूरकर, बाळासाहेब लाड, संदीप पाटील, डॉ. निवास पवार, ब्रह्मानंद पाटील, आनंदराव मोहिते उपस्थित होते.
पंढरपूरला संपर्क कार्यालय : अतुल भोसले
कृष्णा कारखान्याच्या परिसरातील वारकरी लोकांबरोबर इतरांनाही पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन सहज व्हावे, यासाठी विठ्ठल मंदिराजवळील तुकाराम भवन येथे संपर्क कार्यालय सुरु केले आहे. येथे आलेल्या भाविकांना तात्काळ दर्शन मिळवून देण्यासाठी भवनामध्ये कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
इंद्रजित मोहिते यांना सुरेश भोसलेंचा टोलाकारखान्याची आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी प्रत्येक सभासदाने अहवाल वाचन केलेच पाहिजे. त्यांना अहवाल समजलाच पाहिजे. परंतु ज्यांना अहवाल समजत नाही, तेच वाचतात अन् अनावश्यक प्रश्न उपस्थित करतात, असा टोला अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे नाव न घेता लगावला.