अखेर शिक्षण मंडळ बरखास्त

By admin | Published: November 6, 2014 10:38 PM2014-11-06T22:38:29+5:302014-11-06T22:58:31+5:30

महापालिकेला आदेश प्राप्त : शिक्षण समिती नियुक्त होणार

Finally dismissed the education board | अखेर शिक्षण मंडळ बरखास्त

अखेर शिक्षण मंडळ बरखास्त

Next

सांगली : महापालिका शिक्षण मंडळाच्या अस्तित्वावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे सांगली महापालिका शिक्षण मंडळाचे अस्तित्वही संपुष्टात आले आहे. त्याजागी आता शिक्षण समितीची स्थापना होणार आहे.
राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंमलात आल्यानंतर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे अस्तित्व धोक्यात आले होते. काही महापालिकांनी शिक्षण मंडळे कायम ठेवावीत, यासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी, या उद्देशाने मंडळाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर राज्य शासनाने शिक्षण मंडळे विसर्जित करण्याचा अध्यादेशच काढल्याने आता त्यांचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शिक्षण विभागाचे आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी २८ आॅक्टोबर रोजी महापालिकेच्या आयुक्तांना आदेशाची प्रत पाठविली आहे. या आदेशात अधिनियमातील कलम ३ (२) (क) नुसार शाळा मंडळे, स्थानिक समित्या किंवा इतर कोणत्याही समित्या किंवा मंडळे त्यांच्या संबंधित पदावधी समाप्त झाल्यानंतर विसर्जित होतील आणि सदस्य आपली पदे रिक्त करतील, असे म्हटले आहे.
त्यानुसार सांगली महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत वर्षभरापूर्वीच संपली आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच शिक्षण मंडळाचे सदस्यही बरखास्त होतात. गेल्या वर्षभरापासून शासनआदेश नसल्याने तत्कालीन सभापती मानसिंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंडळाचे कामकाज सुरू होते. पण नव्याने एकाही सदस्याची निवड करण्यात आलेली नव्हती. केवळ सभापतीच अस्तित्वात होते. आता शासनाच्या आदेशाने संपूर्ण शिक्षण मंडळच बरखास्त झाले आहे. आता नव्या समितीत वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी होणार आहे. (प्रतिनिधी)
पाच नगरसेवकांची समिती
नव्या कायद्यानुसार शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत पाच नगरसेवकांचा समावेश असेल. स्वीकृत नगरसेवकाला समितीत संधी मिळणार नाही. या पाचपैकी एक समितीचा सभापती असेल, तर समितीचे सर्वाधिकार आयुक्तांच्या कार्यकक्षेत राहणार आहेत.

Web Title: Finally dismissed the education board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.