अखेर ‘जलदूत’ पूर्णक्षमतेने रवाना

By admin | Published: April 19, 2016 11:49 PM2016-04-19T23:49:04+5:302016-04-20T00:34:31+5:30

प्रयोग यशस्वी : मिरजेतून लातूरसाठी एकाचवेळी २५ लाख लिटर पाणी

Finally, the 'Jaladoot' was released in full swing | अखेर ‘जलदूत’ पूर्णक्षमतेने रवाना

अखेर ‘जलदूत’ पूर्णक्षमतेने रवाना

Next

मिरज : लातूरकरांची तहान भागविण्यासाठी मिरजेतून एकाचवेळी ५० टॅँकरमधून २५ लाख लिटर पाणी घेऊन ‘जलदूत’ एक्स्प्रेस मंगळवारी रात्री रवाना झाली. प्रशासनाचे अथक प्रयत्न मार्गी लागल्याने ही रेल्वे आता पूर्णक्षमतेने पाणी घेऊन जाणार आहे. येथील रेल्वे यार्डात टॅँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येणार आहे.
पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे जलशुद्धिकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनी व उच्च क्षमतेच्या मोटारी बसविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यंत्रणेद्वारे रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत नदीच्या पाण्याचा साठा करून ते पाणी रेल्वे टॅँकरमध्ये भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. गेले नऊ दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येत होते. आता उच्च दाबाने टॅँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने व ५० टॅँकरच्या दोन रेल्वे (पान ११ वर)

(पान १ वरून) उपलब्ध झाल्यामुळे लातूरकरांना दररोज २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्डापर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे रेल्वे स्थानकाजवळील हैदरखान विहिरीत पाण्याचा साठा करून मंगळवारी सकाळी प्रत्येकी ५४ हजार लिटर क्षमतेचे ५० टॅँकर भरण्यास सुरुवात झाली. ७० मिनिटात सात टॅँकर, या गतीने आठ तासात ५० टॅँकर भरण्यात आले. रेल्वेच्या स्वतंत्र पाणी योजनेचे काम करणारे मिरजेतील शशांक जाधव व वाघेश जाधव यांनी दहा दिवसात अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण केले. १ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या या कामास इतरवेळी आठ ते दहा महिन्यांची मुदत देण्यात येते. हे काम मात्र पाणीपुरवठा यंत्रणेचे दहा दिवसात पूर्ण केल्याने दररोज ५४ हजार लिटरचे ५० टॅँकर भरण्याची व्यवस्था झाली आहे.
थेट रेल्वे बोर्डाकडून आदेश असल्याने पुणे विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी मिरजेत पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामावर लक्ष ठेवून होते. गेले दहा दिवस रेल्वे स्थानकात तळ ठोकून असलेल्या जीवन प्राधिकरणच्या व रेल्वे अधिकाऱ्यांचा तणाव दूर झाला. मिरज रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेली यंत्रणा कायमस्वरूपी पाणी टॅँकर भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. (वार्ताहर)

आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा
लातूरला जाणारी जलदूत एक्स्प्रेस मंगळवारी रात्री उशिरा मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार सुरेश खाडे यांनी तिला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रांताधिकारी सुभाष बोरकर, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, गजेंद्र कुळ्ळोळी, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, तानाजी घार्गे, मोहन व्हनखंडे, संदीप शिंदे, रोहित चिवटे, राजा देसाई, शशांक जाधव, वाघेश जाधव, स्थानक अधीक्षक व्ही. रमेश यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जा
मिरज रेल्वे स्थानकातून मंगळवारी सकाळी पाच लाख लिटर पाणी घेऊन दहा टॅँकरची नववी खेप लातूरला पाठविण्यात आली. रेल्वे यार्डात एकाचवेळी २५ लाख लिटर पाणी भरण्याची सोय झाल्याने आता दररोज ५० टॅँकर लातूरला जाणार आहेत. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला ‘जलदूत’ हे नाव देण्यात आले असून ‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जलदूत कोणत्याही स्थानकावर क्रॉसिंगला न थांबता लातूरला रवाना होईल. मिरजेतून लातूरपर्यंत जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात. मात्र जलदूत एक्स्प्रेस सात तासात लातूरला पोहोचणार आहे.


उदगीरमधूनही पाण्याची मागणी
लातूरजवळील उदगीर येथेही तीव्र पाणीटंचाई आहे. लातूरप्रमाणे उदगीर येथेही मिरजेतून रेल्वे टॅँकरने पाणी पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरजेत पाणी उपलब्ध असले तरी, एकाचवेळी अनेक शहरांसाठी टॅँकर भरण्याची यंत्रणा नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Finally, the 'Jaladoot' was released in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.