...अखेर काळवीटाला जीवदान
By Admin | Published: August 8, 2016 11:11 PM2016-08-08T23:11:28+5:302016-08-08T23:38:54+5:30
जाधववाडीतील घटना : वन कर्मचारी व ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले
खानापूर : जाधववाडी (ता. खानापूर) येथील डवरी मळ्यातील एका विहिरीत मोठे काळवीट पडल्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. विहिरीत असणाऱ्या दहा फूट पाण्यामुळे काळवीट वाचले. रविवारी रात्री आठच्या सुमारास काळवीटास ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात यश आले.
जाधववाडी (ता. खानापूर) येथील डवरी मळ्यात शंकर धोंडी कदम व बंधूची समाईक विहीर आहे. विहिरीत दहा फूट पाणी आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाधववाडी वन विभागाच्या हद्दीकडून एक मोठे काळवीट धावत आले व अचानक कदम यांच्या विहिरीत पडले. विहीर १२५ फूट खोल आहे. मात्र विहिरीत पाणी आहे. विहिरीतील पाण्यामुळे काळवीट बचावले. विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज झाल्याने शेतातील लोक विहिरीकडे धावले. त्यावेळी त्यांना मोठी शिंगे असलेले काळवीट विहिरीत पोहत असल्याचे दिसले. ग्रामस्थांनी त्वरित वन विभागास माहिती देण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांशी संपर्क न झाल्याने डवरी वस्तीवरील तरुणांनी विहिरीत दोर टाकून काळवीटास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर वनरक्षक राजेंद्र कुंभार, सर्जेराव ठोंबरे व वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री काळवीटास जिवंत विहिरीबाहेर काढले.
या काळवीटास गाडीत घालत असताना ते ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांच्या हातून निसटून पळून गेले. काळवीटाचे एक शिंग मोडले होते, तर एका शिंगाला जखम झाली होती. इतर कुठेही जखम झाली नव्हती.
काळवीटास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रल्हाद सावंत, दिलीप भोसले, उध्दव साळुंखे, बंडाजी कदम, बाळासाहेब कदम, शहाजी कदम, संभाजी कदम, वन कर्मचारी चंद्रकांत मंडले, तानाजी यादव, शरद पाटोळे व जोतिराम मंडले यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
काळवीट आले कुठून? : ग्रामस्थांमध्ये चर्चा
काळवीट दुपारच्या वेळेस क से आले व कोठून आले? याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू होती. काळवीट जाधववाडी वन विभागाच्या हद्दीकडून आले. त्याचा कुत्री पाठलाग करत होती. जीव वाचवताना त्याला रस्ता न समजल्याने ते चुकून विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांनी संगितले. परंतु जाधववाडी परिसरात काळवीट नाही. असेल तर काळवीटाचा कळप कसा दिसला नाही?, असाही प्रश्नही उपस्थित होत आहे. काहींच्या मतानुसार काळवीट सागरेश्वर अभयारण्यातून चुकून बाहेर पडले असावे व भटकत जाधववाडी शिवारात आले असावे.