अखेर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर

By admin | Published: January 12, 2016 12:15 AM2016-01-12T00:15:59+5:302016-01-12T00:41:23+5:30

जिल्हा परिषद : राजीनामा नाट्यावर पडदा : १५ जानेवारीला सत्ताधारी गटाची बैठक

Finally, the resignations of the office bearers | अखेर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर

अखेर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सादर

Next

सांगली : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबतच्या तर्कवितर्कांना सोमवारी पूर्णविराम देत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले. सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्याकडे सभापतींनी आपले राजीनामे दिले. उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी यापूर्वीच आपले राजीनामे सादर केले आहेत. सभापती मनीषा पाटील आणि उज्ज्वला लांडगे यांनी राजीनामे दिल्याने, आता नूतन पदाधिकारी निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि आगामी रणनीती ठरविण्यासाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाची बैठक शुक्रवार, दि. १५ जानेवारीला बोलाविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापतींना पक्षाने ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल २० डिसेंबरला पूर्ण झाल्याने उर्वरित सव्वा वर्षासाठी नवीन पदाधिकारी निवडी होणार आहेत. त्यानुसार सत्ताधारी गटाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना राजीनामे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्याकडे आपले राजीनामे दिले होते. समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे यांचाही राजीनामा अध्यक्षांकडे आला होता. मात्र, सभापती मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. पाटील यांच्या राजीनामा न देण्याच्या पवित्र्यामुळे सत्ताधारी गटात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि तानाजी पाटील यांच्यातील चर्चेनंतर त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.
जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पाटील यांनी राजीनामा दिला. सोमवारी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर तो अध्यक्षांकडे सादर करण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून सुरू असलेल्या चर्चेलाही यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सत्ताधारी गटातील सदस्यांची बैठक बोलाविली असून, यात सदस्यांची मते अजमावून राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ. जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने आता इच्छुक सदस्यांनी प्रयत्न चालविले आहेत. (प्रतिनिधी)


सत्ताधारी गटाची बैठक : निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केल्यानंतर राजीनाम्याबाबत चर्चा करण्यासाठी व नूतन पदाधिकारी निवडीबाबत सदस्यांची मते अजमावून पाहण्यासाठी शुक्रवार, दि. १५ जानेवारीला सत्ताधारी गटाची बैठक बोलाविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


इच्छुकांची जोरदार ‘फिल्डिंग’
पदाधिकारी निवडीत पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने पदाधिकाऱ्यांचे राजीनामानाट्य चांगलेच रंगले होते. मात्र, सोमवारी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याने इच्छुकांचा जीव खऱ्याअर्थाने भांड्यात पडला असून, आता इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटातील बदललेल्या समीकरणामुळे नूतन पदाधिकारी निवडी करत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसला बरोबर घेणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Finally, the resignations of the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.