अखेर जलशुद्धीकरण प्रकल्प उद्घाटनावर पडदा : काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:27 PM2018-05-24T23:27:04+5:302018-05-24T23:27:04+5:30
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद््घाटनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर गुरुवारी पडदा टाकण्यात आला. उद््घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस,
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद््घाटनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर गुरुवारी पडदा टाकण्यात आला. उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांची नावे समाविष्ट करून कार्यक्रमाला सर्वपक्षीय स्वरुप देण्यात आले. तरीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसने मात्र निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे.
सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ७० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. निवडणुकीआधी या प्रकल्पाचे उद््घाटन घेऊन श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. येत्या रविवारी, २७ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद््घाटन होणार आहे. त्यानंतर काँग्रेसचा मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जाणार आहे. त्याची जय्यत तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.
पण या प्रकल्पासाठी शासनाचा निधी असल्याने सर्वपक्षीयांना निमंत्रित करावे, असा आग्रह शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी आयुक्तांकडे धरला होता. त्यातून आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करीत भाजप खासदार, आमदारांचाही पत्रिकेवर समावेश करण्याचा आग्रह धरला. यातून काँग्रेस विरूद्ध आयुक्त असा नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे होती. अखेर सत्ताधाऱ्यांनी दोन पावले मागे घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या नावांचा निमंत्रण पत्रिकेवर समावेश करून या वादावर पडदा टाकला.
आता रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होत आहे.
या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांची विशेष उपस्थिती असेल, तर खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस : जय्यत तयारी सुरू
प्रकल्प लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासह गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांची जंत्रीही जनतेसमोर मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यात २४ कोटीचे रस्ते, नवीन उद्यानांना मंजुरी अशा कामांचा समावेश आहे. महापौर हारूण शिकलगार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद््घाटन व पक्षाचा मेळावा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत करण्याची घोषणा महापौर व सत्ताधारी कारभाºयांनी केली होती. परंतु जलशुद्धीकरण योजनेमध्ये सर्वच पक्षांचे योगदान असल्याने त्याचे श्रेय फक्त काँग्रेसने लाटू नये व सर्वांना सोबत घेऊन उद््घाटन करावे, अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनीही सहमती दर्शविली होती. परस्पर उद््घाटन करण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना या प्रकल्पाचे एक दिवस आधीच उद््घाटन करेल, असा इशाराही दिला होता. याचा धसका सत्ताधाºयांनी घेऊन कार्यक्रम सर्वपक्षीय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- शेखर माने, नगरसेवक, शिवसेना