वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून सात कोटींचा दंड प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:33 AM2021-02-25T04:33:43+5:302021-02-25T04:33:43+5:30
सांगली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे ई चलनाद्वारे दंड करण्यात येतो. मात्र, अनेक वाहनधारक हा दंडच भरत नसल्याचे ...
सांगली : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनातर्फे ई चलनाद्वारे दंड करण्यात येतो. मात्र, अनेक वाहनधारक हा दंडच भरत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत ९ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मात्र, त्यातील केवळ २ कोटी ४० लाख रुपये दंड भरण्यात आला असून, अद्यापही ७ कोटी ४ लाख ३० हजार ७०० रुपये दंड प्रलंबित असून तो वाहनचालकांनी भरावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले.
अधीक्षक गेडाम म्हणाले, वाहतुकीला शिस्त लागावी व नियमांचे पालन व्हावे यासाठी वाहतूक शाखेसह पोलीसही कारवाई करीत असतात. त्यात नियम मोडणाऱ्यांना ई चलनाद्वारे दंड केला जातो. गेल्या तीन वर्षांत बेशिस्त वाहनचालकांना ९ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यांपैकी आतापर्यंत २ कोटी ४० लाख रुपये दंड भरण्यात आला असला तरी अद्यापही दंडाच्या वसुलीस प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी स्वत:हून झालेला दंड भरून प्रशासनास सहकार्य करावे. ई चलनाद्वारे झालेला दंड न भरल्यास अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे.